Tuesday, July 31, 2007

राम नदी किनारे मेरो गाव सावरे आजय्यो, सावरे आजय्यो.

अहो फेकाडे भावोजी, ऐकले का ? आपल्या पुण्यात म्हणे राम नदी चक्क गिळकृत झाली, तिला म्हणे अनिर्बंध अतिक्रमणांची मगर "मिठी" बसली.

अग मीने, मीने , मीने, तु म्हणतेस तरी काय ? आता पर्यंत फक्त सरस्वती नदी लुप्त झाल्याचे वाचले होते, हा त्यातलाच प्रकार की काय ?

पण काय हो फेकाडे भावोजी, हे कसे काय झाले असावे हो ? काही कळत नाही.

अहो मीनावहीनी, गुप्तधनाची गंगा जमीनीखालुन वाहु लागली की कधी कधी होते असे. तिच्या प्रवाहात हा "नदीचा केलेला नाला" लोप पावतो, त्याचे स्वतंत्र अस्तीत्व नाहीसे होते, आता हे फारसे मनाला लावुन घेयचे नाही बर का. आता बघ, येथे माणसांनाच रहायला जागा नाही मग नदी, नाले, ओहोळ, आणि ओढे यांना जागा कुठुन मिळणार ? पावसाळ्यात होतो अधुन मधुन त्रास, मग जरासा आरडाओरडा होतो खरा, पण तो तेवढ्या पुरताच. सरस्वती लुप्त पावली तेव्हा कोणी काहीतरी बोंब मारल्याची आठवते काय ? आपण आपले वाचायचे व विसरुन जायचे.

परत मीने बर का तुला म्हणुन सांगतो, लोकांना बोंबाबोंब करायची सवयच लागली आहे. दर वर्षी काहीतरी नवे कारण लागते,. गेल्या वर्षी आठवते का ग तुला, "खड्डे रस्तात की खड्डात रस्ते" करत केवढे रान उठवले होते, आता यंदाला हा नवीन विषय "नदीत, ओढ्यावर, नाल्यावर अनधिकृत बांधकामे की बांधकामातुन पाण्याचे प्रवाह ? "

फेकाडे भावोजी खर आहे तुमचे बोलणे, बसा हं, तुमच्यासाठी गरमागरम कांद्याची खेकडा भजी करते, तो वर बोट येयीलच, तुम्हाला आमच्या सोसायटीतुन बाहेर सोडायला.

हरे कृष्णजी

सदर्भ -
सुनीत भावे - सकाळ वृत्तसेवा - रामनदी गिळंकृत!, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर"मिठी'


(पुर्वी आकाशवाणीवर एक श्रुतीका लागायची. टेकाडे भावजी, मीना वहीनी ही त्यातली प्रमुख पात्रे. त्या धर्तीवर? )

Sunday, July 29, 2007

त्रिवार वंदन तुला गुरु..

जेव्हा ,
मन भरकटते ,
विचारांच्या सागरात ,
गुरु , दीपस्तंभ बनतोस तू..
तेव्हा ,
बनते तरबेज खलाशी मी..

जेव्हा ,
अनोळखी होते ,
आरशातल्या छबीत ,
गुरु , ओळख पटवतोस तू..
तेव्हा ,
होते लक्षवेधी चेहरा मी..

जेव्हा ,
एकटी पडते ,
स्वत:च्याच गावात ,
गुरु , पाठिंबा असतोस तू..
तेव्हा ,
करते बलाढ्य नेतृत्व मी..

जेव्हा ,
धाडस कोसळते ,
भयाच्या कोठडीत ,
गुरु , प्रेरणा देतोस तू..
तेव्हा ,
घेते उत्तुंग भरारी मी..

जेव्हा ,
निराशा पसरते ,
अपयशाच्या अंधारात ,
गुरु , प्रकाश होतोस तू..
तेव्हा ,
बघते नवी दुनिया मी..

आता ,
नभावरही नाव माझे लिहीन ,
गुरु , लेखणी माझी आहेस तू..

त्रिवार वंदन तुला गुरु..त्रिवार वंदन तुला गुरु..


- स्वप्ना कोल्हे

Friday, July 27, 2007

फक्त थोडा वेळ...

एक होता लेखक. रोज पहाटे तो समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लिहीत बसे. त्याआधी समुद्रकिनारी फिरण्याचाही त्याचा नेम होता. एके दिवशी फिरताना समुद्रापाशी एक माणूस नाचत असल्यासारखा लयबद्ध हालचाली करताना त्याला दिसला. त्याने कुतूहलाने जवळ जाऊन पाहिले, तर तो माणूस वाकून काहीतरी उचलत होता आणि समुद्रात सोडत होता. लेखकाने त्याला विचारले, ""तू हे काय करतो आहेस?'' ""किनाऱ्यावर आलेले हे स्टारफिश पुन्हा समुद्रात सोडतोय,'' त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिले.
""पण का?''
""सोपं आहे. थोड्याच वेळात सूर्य उगवेल. हळूहळू त्याची किरणं तप्त होतील. ते ऊन या माशांना सहन होणार नाही. मासे मरतील. म्हणून त्याआधीच मी त्यांना पुन्हा समुद्रात सोडतो आहे.''
""भल्या मित्रा, आपल्या देशात असे कित्येक किलोमीटर लांबीचे समुद्रकिनारे आहेत. रोज असे किती तरी स्टारफिश लाटांबरोबर वाळूवर पडत असतील. तू इथे काही स्टारफिश पुन्हा पाण्यात सोडून काय साध्य होणार आहे?'' बोलणं सुरू असतानाही त्या तरुणाचे हात थांबलेले नव्हते. लेखकाचा प्रश्‍न ऐकून त्यानं एक स्टारफिश उचलला आणि पाण्यात सोडला. तो म्हणाला, ""या एकासाठी तर फरक पडला ना! मला वाटतं, आपल्या सर्वांमध्ये एक शक्ती आहे. आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात निश्‍चितच फरक पडू शकतो. परमेश्‍वराने आपल्या सर्वांनाच ही देणगी दिली आहे. एकामुळे दुसऱ्याच्या, दुसऱ्यामुळे तिसऱ्याच्या आणि तिसऱ्यामुळे चौथ्याच्या आयुष्यात फरक पडू शकतो. आपण फक्त आपला "स्टारफिश' शोधायला हवा! त्याला निवडून हळुवारपणे पाण्यात सोडायला हवं. असं झालं तर हे जग नितांतसुंदर होईल.''
या गोष्टीचा लेखक माहीत नाही; परंतु तो मोठा द्रष्टा आहे, हे निश्‍चित. आपण बारकाईने पाहिले, तर असे कितीतरी स्टारफिश आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांना उचलणे आणि प्रवाहात सोडणे, एवढे लहानसे काम आहे. त्याला पैसा लागतो का? नक्कीच नाही. परवाच एका आजोबांची भेट झाली. निवृत्तीनंतर काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. त्यांनी आपल्या परीने त्यावर उपाय शोधला. जवळच्याच एका रुग्णालयात ते रोज जाऊ लागले. रुग्णांना धीर देणे, गरज असल्यास त्यांच्याजवळ बसणे, बरोबर आलेल्या नातेवाइकांना पाय मोकळे करण्यासाठी उसंत देणे, एखादा रुग्ण दगावल्यास पुढच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणे, अशी कामे ते उत्साहाने करू लागले. ते म्हणाले, ""त्या रुग्णांवर उपचार करण्याएवढे पैसे माझ्याकडे नाहीत; पण त्यांना द्यायला वेळ आहे. मी तोच देतो.''
व.पुं.ची एक कथा आहे. "केव्हाही बोलवा' या संस्थेचे वर्णन त्यात आहे. सात जणांचा गट लोकांच्या गरजेच्या वेळी धावून जातो. रुग्णालयात थांबणे, गर्दीच्या वेळेत गरजूंसाठी रेल्वेमध्ये जागा धरून ठेवणे, अशी कामे हा गट करत असतो. ही कथा काल्पनिक असली, तरी त्यामागची स्फूर्ती, कल्पना मात्र काल्पनिक नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात. फक्त पैसा देऊन काही साध्य होते, असे नाही. वेळ देणेही तेवढेच महत्त्वाचे असते.
आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून फक्त एक तास आपल्या "स्टारफिश'साठी द्यायचे ठरवले तर? हे अशक्‍य आहे? नक्कीच नाही. थोडा विचार आणि थोडा वेळ, एवढेच हवे आहे. "आठवड्यातून फक्त एक तास' हे सूत्र पुरेसे आहे.
एखाद्या डॉक्‍टरने थोडा वेळ काढला, तर एका तासात कमीत कमी पाच गरीब रुग्णांना तरी तपासता येईल. त्यांना ती मोठी मदत होईल. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली की कार्यक्षमता वाढेल. त्यांना पुढेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे मिळत राहतील. मुळात त्यांच्यात आरोग्याविषयी जागरुकता निर्माण होईल. या जागरुकतेचा सकारात्मक परिणाम कित्येकांवर होईल.
एखाद्या विषयातील तज्ज्ञाने विद्यार्थ्यांसाठी वेळ द्यायला सुरवात केली, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता निर्माण होईल. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही माहिती मिळेल. त्याचा फायदा पुढील आयुष्यात होऊ शकेल. हीच गोष्ट त्या मुलांकडून पुढे पाझरत जाईल.
विद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांसाठी किंवा अनाथ मुलांसाठी असा वेळ दिला, तर त्यांच्या अंगणात आनंदाचे झाड फुलेल. अंतिम टप्प्यावर असणाऱ्यांना कृतार्थता आणि पहिल्या टप्प्यावर असणाऱ्यांना आनंदाची देणगी, हे अगदी सहज होऊ शकेल.
आपण कदाचित खूपसारा वेळ, पैसे देऊ शकणार नाही; पण आठवड्यातून फक्त एक तास? होईल, हे नक्की होईल. कवी संदीप खरे म्हणतो, "मुहूर्त माझा तोच, ज्या क्षणी हो इच्छा...' चला, एक पाऊल तरी पुढे टाकू.

अभिजित थिटे

Thursday, July 19, 2007

"जी गोष्ट भारतात शक्य आहे पण चीन मधे नाही "

विक्रमा अशी कोणती गोष्ट आहे की ज्यात भारताची बरोबरी चीन करु शकत नाही ? भारतात जे जमते ते चीनमधे जमत नाही ? जी गोष्ट भारतात शक्य आहे पण चीन मधे नाही ? वेताळाने गुगली टाकत प्रश्न विचारला. माझा प्रश्नाचे उत्तर दे नाहीतर .......

वेताळा ऐक तर, तु २३ जुनचा साप्ताहीक सकाळ ( चीनमधे हे कसे जमते ? ) वाचलेला दिसतोस. हा प्रश्न त्याचाच परिणाम आहे. असो. तुला ऐकुन ठावुक असेलच चीनने तिबेटच्या पठारावर अत्यंत प्रतीकुल परीस्थीतीत रेल्वे मार्ग बांधला, त्यांच्या कडे ४३२ किलोमीटरच्या वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन आहे .

विक्रमा आता तु मला परत या रेल्वे वर लेक्चर देणार आहेस काय रे ? आपल्याकडे कोणत्या परिस्थितीत कोकण रेल्वे बांधली विसरलास काय रे ? आता बोरीवली-विरार मधला चौपदरी मार्ग ही बांधुन पुरा होतोय ना ? होणार आहे ना ?

अरे वेताळा मला रेल्वे लाईन नव्हे तर त्यावरील पादचारी पुलाबद्द्ल तुला काहीतरी सांगायचय. मुंबापुरीत, चरनी रोड नामक रेल्वेस्थानका बाहेरील पादचारी पुल बांधल्यानंतर हाताच्या बोटावर मोजता येतील येवढ्याच वर्षात मोडकळीस आला. आता तो का व कसा जीर्ण झाला हा विषय वेगळा. मग तो पाडुन त्या जागी नवीन पादचारी पुल बांधायला घेतला. नवा पुल "स्टेट ऑफ आट्‌र्स " असणार होता. या पुलावरुन दररोज लाखो रेल्वे प्रवासी ये जा करीत असत, येथला रस्ताही दक्षिण मुंबईतुन बाहेर पडण्याचा मुख्य रस्ता. मग ते हजारो, लाखो, प्रवासी सरळ रस्तावर, रस्ता पार करण्यासाठी येवु लागले, वाहतुकीस अडथळा होवु लागला, अडथळे, अडचण सर्वांनाच.

अभिमानाची गोष्ट म्हणजे अत्यंत विक्रमी वेळात या पुलाचे बांधकाम पुर्ण झाले, त्याबद्दल लोकप्रतिनीधींनी स्वतःच स्वताला शाबासकी देत अभिमानाने व गर्वाने पाठ थोपाटुन घेतली,

विक्रमा माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नव्हे.
वेताळा ऐक तर खरे, हा बांधकामाचा कालाविधी फक्त जवळ जवळ २१ महीने म्हणजे पावणे दोन वर्षे होता. थोडेसे कमी जास्त, इकडे तिकडे.

आता सांग, ही दिरंगाई, हा विलंब , हा जनतेचा सोशीकपणा, ही कॉंट्रक्टर व संबधीताची बेपर्वायी, केवळ भारतातच शक्य आहे, नाही का ? चीनला हे जमणे व परवडणे नाही असे तुला वाटत नाही काय रे ?

तु बोललास व मी चाललो, या पुलावरुन.


हरे कृष्णजी

Tuesday, July 3, 2007

** करेल वटपौर्णिमा साजरी.. **

विचार आधुनिक जरी ,
श्रध्दा देवावर माझी
होईन सौ जेव्हा मी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..

असेल ऑफिस जरी,
वडपूजा जमणार नाही
डगाळ आणून घरी,
करेल वटपौर्णिमा साजरी..

एवढा आटापिटा ,
फक्त तुझ्या साथीसाठी
होऊन थोडी स्वार्थी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..

विज्ञान म्हणते,
राखेत संपेल सर्वकाही
भोळे मन म्हणते,
तरीही...

एकच ' हा ' जन्म जरी ,
सावित्रीची लेक मी
अनंताच्या वाटेवरही
करेल तुला साथ मी....


- स्वप्ना

** जन्मोजन्मी हाच पती ? **

चालले मी चालले , वड पूजायला
जन्मोजन्मी हाच पती मागायला..

माझ्या ' ह्यांची ' काय वर्णावी थोरवी
' ह्यांची ' आहे मी एकमेव ' चाहती '..
(दूसरे कुणीच ह्यांचं कौतुक करत नाही)

सांगते ' ह्यांची ' करमणूकीची साधनं..

ऑफिस , मित्र , टीव्ही , वर्तमानपत्र
ओर्कुटींग आणि कविता करणं..

वेळ मिळताच माझ्याशी वाद घालणं
आणि सासरच्यांची खेचाखेची करणं..

पण , मला महत्वाचं ह्यांच निर्व्यसनी असणं
भावतं , कामात माझ्या मदतीसाठी धावणं..

मी आजारी पडले की मला जपणं
प्रेम शब्दांतून नाही , कृतीतून व्यक्त करणं..

'अनोळखी देवदूतापेक्षा ओळखीचा राक्षस बरा' मला पटते
(देवा , गंमतीने बोलले रे)

म्हणून , जन्मोजन्मी मी हाच पती मागते..


- स्वप्ना

** आली वट वट पौर्णिमा **

आली वट वट पौर्णिमा
की लागते मला धडकी भरायला..

अरे यार , सौ माझी भलतीच भारी
माझे ' आरक्षण ' करते जन्मोजन्मीसाठी..

कॉलेज मधली परी , ऑफिसातली फटाकडी
सिनेमातली नटी , झुरतो सा-यांसाठी..

पण देवा , असा कसा रे तुझा न्याय
दर जन्मी मला ' वेगळा ' पर्यायच नाय ?

एखाद जन्मी मिळाली असती ' विश्वसुंदरी '
तर माझीही वट वाढली असती..

पण, ती सुंदरी मनाने सुंदर असेल ?
' प्रसंगी ' माझी सावित्री ती बनेल ?

दूसरीकडे माझी सौ..

तसं बावळंच आहे हिचं ध्यान
पण कर्तव्यांचे हिला सदा भान..

माझ्या गबाळ अवतारातही मला हिरो म्हणते
माझ्या सुमार कवितांना हमखास दाद देते..

ऑफिस, घर ,पाहुणे तारेवरची कसरत करते
फाटक्या संसाराला माझ्या तीच ठिगळ लावते..

तिच्या सच्च्या प्रेमापुढे मी हरतो
तिची वटपौर्णिमा फळावी हेच मागतो..


- स्वप्ना