Saturday, May 31, 2008

...खुनापर्यंत का यावं?

जगण्याचा वाढता वेग, तीव्र स्पर्धा, सगळं काही स्वत:ला मिळायलाच हवं असा अट्टहास, त्यातून बदलणारे सूर, बदलती कुटुंब व्यवस्था, नवी लाइफस्टाइल या सगळ्यातून कमी होत जाणारा इमोशनल कोशंट... दिल्लीत नुकत्याच झालेल्या आरुषीच्या आणि मुंबईतील नीरज ग्रोव्हरच्या खुनामागे ही कारणं असावीत का? धावता धावता आपल्यातील हिंसेंची ही आदिम प्रेरणा उफाळून वर आली आहे का?

वैशाली रोडे

दिल्ली व मुंबई येथे घडलेल्या दोन घटनांनी सध्या संपूर्ण देश अस्वस्थ झाला आहे. एक आहे दिल्लीजवळील नॉयडा या उपनगरात घडलेली घटना. व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या डॉ. राजेश तलवार यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या आरुषी या मुलीचा आणि तिचे ज्याच्याशी संबंध असल्याचा त्यांना संशय होता, त्या हेमराज या नोकराचा खून केल्याचा पोलिसांचा दावा आहे. राजेश तलवार यांचे आपल्या एका डॉक्‍टर मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते आणि आरुषीला हे ठाऊक होतं. तिला हे आवडत नव्हतं. आपली अस्वस्थता ती हेमराजकडे व्यक्‍त करत असे आणि त्यातूनच ते दोघे जवळ आले असावेत, त्यातूनच हे घडलं असावं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. डॉ. राजेश तलवार यांची डेंटिस्ट पत्नी डॉ. नुपूर तलवार यांनी आपले पती निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला आहे.

दुसरी घटना आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात घडलेली. मारिया सुसयराज या अभिनेत्रीने आपल्या नेव्हल ऑफिसर असलेल्या मित्राच्या, जिरोम मॅथ्यूच्या साथीने एका टीव्ही चॅनेलच्या क्रिएटिव्ह हेडचा- नीरज ग्रोव्हर याचा खून केला. त्याचे तुकडे केले आणि ते मोठमोठ्या पिशव्यांमध्ये भरून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मारिया ही दक्षिणेतली, कन्नड चित्रपटांत कामं करणारी अभिनेत्री आपलं नशीब आजमावायला मुंबईत आली. कामं मिळवता मिळवताच तिची नीरजशी ओळख झाली, मैत्री झाली. तिचा कोचीचा मित्र मॅथ्यू याला ही मैत्री आवडत नव्हती. त्यातूनच मारियाचं नवं घर लावायला तिला मदत करण्यास गेलेल्या नीरजचं आणि मॅथ्यूचं भांडण झालं आणि मॅथ्यूनं नीरजला भोसकून ठार केलं. मारिया आणि मॅथ्यूनं नंतर नीरजच्या देहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही घटना तसं पाहिलं तर वेगवेगळ्या; पण तरीही दोन्हींमध्ये काही साम्य आहेच. दोन्ही घटना खुनाच्या आहेत एवढंच फक्‍त त्यांच्यातलं साम्य नाही; दोन्हीमध्ये प्रेमाचा कोन आहे. पण फक्‍त तोही त्यांच्यातला सारखेपणा नाही. या दोन्ही घटना सध्याच्या शहरी लाइफस्टाइलचा परिणाम आहेत.

नवी लाइफस्टाइल

माणसाला मारणं आपल्याकडे तर नाहीच; पण जगात कुठंही नवं नाही. हिंसा ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. जसजसा माणूस सुसंस्कृत होत गेला, तसा त्यानं या प्रेरणेवर काबू मिळवला. पण तरीही कधीतरी ती बेकाबू होते, उसळून वर येते. खून, मारामाऱ्या त्यातूनच घडतात. हे दोन्ही खून माणसाच्या या आदिम प्रेरणेतूनच झाले आहेत, हे स्पष्ट आहे. पण सुस्थितीचं आयुष्य उपभोगणाऱ्यांमध्ये ही प्रेरणा बेकाबू व्हावी, असं काय घडलं असावं...?

नेमकं याचंच उत्तर आजच्या शहरी लाइफस्टाइलमध्ये सापडतं."आज आपल्या आयुष्याला प्रचंड गती आली आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला सहज आणि तत्काळ मिळते आहे. फास्ट फूडपासून चॅनेल्सच्या चॉइसपर्यंत आणि क्रेडिट कार्डवर होणाऱ्या खरेदीपासून ट्रेन, विमानांच्या बुकिंगपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या हातात आल्या आहेत. त्यामुळे सुखासाठी वाट पाहण्याची सवयच गेली आहे. माणूस "इम्पेशंट' झालाय. त्याचा "इमोशनल कोशंट,' म्हणजे भावनांक कमी झालाय,' मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजन भोसले म्हणतात. "अर्थात म्हणजे आता सगळं संपलंच असं नाही... ही एक फेझ आहे. ती कधी ना कधी पार पडणारच आहे. भावनांक कमी झालाय आणि म्हणूनच कुटुंबातले एकमेकांशी असलेले संबंधही बदललेत. घरातले सगळेच बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे मुलांवर नीट संस्कार होत नाहीत. या सगळ्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत.

'नेमकं याच्याशी संवादी मत कुटुंब समुपदेशक प्रतिमा हवालदार व्यक्‍त करतात. खरं तर त्या स्वत: त्याला मतही म्हणत नाहीत. "इतकं वेगानं घडतंय सगळं, की त्यावर विचार करायला आणि काही मत बनवायला वेळच मिळत नाहीये. एक असं जाणवतंय, की माणसं एकत्रच राहत नाहीयेत. एकत्र राहिली की त्यांची भांडणं होतात; पण त्यांच्यात बंधही निर्माण होतात. आता प्रत्येक जण आपापल्या व्यापात. स्त्रियांच्या कक्षा रुंदावल्या, त्या घराबाहेर पडल्या. पण हे इतकं हलकंफुलकं मानता येईल का? एखादी गोष्ट सहन करणं, बदलणं हे करण्यासाठी एक स्वस्थता लागते. ती आज आहे का? आजूबाजूच्या वातावरणात त्यासाठी एक शाश्‍वतीही लागते. ती तरी आज कुठे दिसते का? कशाचीच शाश्‍वती राहिली नाही की माणसं बांधूनही राहत नाहीत आणि याचे पडसाद मग सामाजिक आणि वैयक्‍तिक विश्‍वात उमटत राहतात.

कोण पुढे पळे तो...

सध्याच्या स्पर्धेच्या युगाकडे प्रतिमा हवालदार लक्ष वेधतात. "वैयक्‍तिक जगात आज स्पर्धेला महत्त्व आलं आहे. माझं पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आणि तो मागे राहिला तरच मी पुढे जाईन... मग त्याला काही करून मागे खेचा... प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक बाबतीत ही ईर्षा दिसते आहे. प्रत्येकाला काही ना काही साध्य करायचं आहे. प्रत्येक जण कसल्या ना कसल्या शोधात आहे. पण हवं ते मिळत मात्र नाही... म्हणून मग प्रश्‍न पडतो, आता ज्या घटना घडतायत, त्यामागे काय आहे? माणसाच्या वृत्तीतला बदल आहे, की हवं ते मिळत नसल्याची चरफड आहे...?'या दोन घटनांना धरून असे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. सगळ्यांच्याच मनात. त्यांची उत्तरंही आपण आपल्या परीनं शोधत असतो. माणसाची वृत्तीच बदलली आहे का? सध्याच्या चंगळवादी संस्कृतीत कौटुंबिक मूल्यं नष्टच झाली आहेत का? माणूस अधिकाधिक एकटा होतो आहे का? माणसाचा संयम, त्याचा सारासार विवेक कमी झाला आहे का?

या प्रश्‍नांची उत्तरं हो-नाही अशी नेमकी मिळत नाहीत. एकीकडे माणसामाणसांतला संवाद कमी झाला आहे आणि त्यामुळे माणूस एकटा होतो आहे असं आपण म्हणतो; पण दुसरीकडे ज्यांना तो आपलं म्हणतो, त्यांच्याबद्दल फक्‍त आपलेपणाची भावनाच नाही, तर तो मालकी हक्‍कही गाजवू पाहतो. एकीकडे त्याला कुटुंब हवं असतं; पण दुसरीकडे स्वत:ची स्वतंत्र "स्पेस'ही हवी असते. माझं वैयक्‍तिक आयुष्य हे पूर्णपणे वैयक्‍तिक राहिलं पाहिजे, असा त्याचा आग्रह असतो. आधुनिक काळाची असंख्य प्रेशर्स हा माणूस स्वत:च्या डोक्‍यावर घेत असतो. त्यामुळे त्याचा संयम कमी झालेला आहे, तो चिडचिडा होतो आहे हे निर्विवाद; पण त्यामुळे या प्रेशर्समधून तरून जाण्याचा त्याचा आत्मविश्‍वास मात्र हरवत नाही... काही जणांच्या बाबतीत हाच आत्मविश्‍वास अति तर होत नसावा?

आधुनिक जगाचे आधुनिक ताण

संपूर्ण जग आधुनिक झालंय. या आधुनिक जगाची प्रेशर्स प्रत्येकावर आहेत. प्रत्येक देशाची संस्कृती बदलू पाहते आहे. या बदलत्या संस्कृतीचा आणि परिस्थितीचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर होतो आहे. एकूण, प्रत्येक जण सारख्याच परिस्थितीला तोंड देतोय; पण तरीही प्रत्येक माणूस अशी आततायी कृत्यं करत नाही. ती काही जणच करतात.डॉ. राजन भोसले म्हणतात, ""समान परिस्थितीचा परिणाम प्रत्येकावर सारखा होत नाही, वेगवेगळा होतो. ते व्यक्‍तीव्यक्‍तीवरच अवलंबून असतं. आधुनिक पिढी या परिस्थितीतच जन्माला आलेली आहे. त्यामुळे तिचं त्यांना फार काही वाटत नाही, एवढंच.''आजच्या तरुणांमध्ये काम करणाऱ्या "पुकार' संस्थेच्या युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाच्या संचालक वंदना खरे म्हणतात, "आजच्या पिढीपुढे अनेक आव्हानं आहेत. त्यातून निर्माण होणारी अनेक कामं त्यांना पार पाडायची आहेत. हे सगळं करताना आपली नाती जपायची आहेत. कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक अशा सर्व पातळ्यांवरच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. आणि त्याचबरोबर याच सर्व पातळ्यांवर निर्माण होणारी प्रेशर्सही झेलायची आहेत. अशा परिस्थितीत ही पिढी आपले आपण मार्ग शोधते आहे.'

आजची तरुण पिढी अत्यंत आत्मविश्‍वासानं आपले मार्ग आपण शोधते आहे हे तर खरंच आहे; पण ते सारासार विचार करून शोधते आहे असं म्हणता येतं का? "नाही, कधी हे मार्ग चुकीचे असतील...' वंदना खरे म्हणतात. "पण आदल्या, म्हणजे आज 40 आणि 50 या दरम्यान असणाऱ्या पिढीनं त्यांना काही बेसच दिलेला नाही. कोणतीही रोल मॉडेल्स त्यांच्यापुढे उभी केलेली नाहीत. "एकाच शिरावर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या घेऊ नका, असंही आपण त्यांना सांगू शकत नाही. समृद्ध जगणं म्हणजे काय, ते फक्‍त सांगू शकतो; प्रत्यक्ष दाखवू शकत नाही. मला वाटतं सगळ्याचा दोष तरुण पिढीच्या माथी मारण्यापेक्षा तिच्या आदल्या पिढीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. या पिढीला मार्ग दाखवले, तर ती पिढी अधिक चांगली घडू शकते.' प्रत्येकच पिढी आपण पुढली पिढी घडवण्यात असमर्थ ठरलो, असं आयुष्याच्या उतारावर सांगत असते. प्रत्येक पिढीत, प्रत्येक युगात नव्यानं पुन्हा माणसाचा, त्याच्या बदलत्या वृत्ती-प्रवृत्तींचा शोध घ्यावा, असं काहीतरी घडतच असतं. खूनही आपल्याकडे नवे नाहीत. रामन-राघवनपासून अगदी अलीकडच्या वृद्ध जोडप्यांच्या हत्यांपर्यंत. मालाड आणि डोंबिवलीला झालेल्या दोन तरुण मुलींच्या हत्येमागे तर पालकांचाच हात असावा, असा पोलिसांचा संशय होता. हत्या पूर्वीपासून होतायत; मग आताच त्यांचा गाजावाजा का होतो?

मीडिया...

याचं एकमेव कारण म्हणजे "मीडिया एक्‍सपोजर'. प्रिंट असोत की इलेक्‍ट्रॉनिक, माध्यमं आता इतकी स्ट्रॉंग झाली आहेत, की त्यांच्यापासून काही लपून तर राहत नाहीच; पण ती प्रत्येक विषयाला प्रचंड प्रसिद्धी देतात. "आजकाल या मीडियामुळेच एखादी घटना घडली की ती चटकन लोकांना कळते आणि त्यावर भरपूर चर्चा होते. मग आपल्याला वाटतं अशा घटनांचं प्रमाण वाढलंय.... खरं तर घटना घडण्याचं प्रमाण तेच आहे, त्या आपल्यापुढे येण्याचं प्रमाण वाढलंय,' डॉ. राजन भोसले म्हणतात.प्रतिमा हवालदार तर या सगळ्याबद्दल अनेक प्रश्‍न उपस्थित करतात. "हे जे घडतंय, त्याला एवढी प्रसिद्धी दिली जाते आहे... पण ते खरंच नवं काही आहे का? ते सगळं इतकं पटापट सांगितलं जाऊ शकतं का? फक्‍त घटना सांगून माध्यमं थांबत नाहीत, तिच्याबद्दलच्या गोष्टीही लिहून मोकळी होतात. आणि मग या सगळ्याचे पडसाद समाजात उमटतात... हे पडसाद विचार केल्यानंतर उमटलेले असतात की ते उमटवलेले असतात?' वर्तमानपत्रातल्या "क्राइम रिपोर्टर'ला असलेलं पूर्वीचं आणि आताचं महत्त्व पाहिलं, तरी या प्रश्‍नांची उत्तरं मिळतात.अर्थात या मीडिया एक्‍सपोजरला पांढरी आणि काळी अशा दोन्ही बाजू असतात. एकीकडे सध्याच्या वेगवान युगात भोवंडून जात असताना आपल्या आजूबाजूला खूप नवं नसेल, पण तरीही नेमकं काय घडतंय, याचं भान आपल्याला ही माध्यमं देत असतात.नव्या जगाला, नव्या युगाला असलेली गती, त्यामुळे निर्माण झालेली प्रेशर्स या गोष्टी एकीकडे नव्या नाहीत; पण तरीही या वेगाला आणि या परिस्थितीला तोंड देण्याचे अधिक योग्य मार्ग शोधण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. नव्या पिढीच्या धडपडीतूनच हे मार्ग मिळणार आहेत. अधिक माणुसकीचे... माणसाला माणसाच्या जवळ आणणारे... त्याचा तोल सावरणारे... मग एका हातात राक्षसाचं शीर आणि इतर सर्व हातांत शस्त्र घेतलेली दुर्गा आपण पुजत असलो; आपल्या इतिहासात छोट्या पुतण्याला मारण्यासाठी "ध' चा "मा' करणारी आनंदीबाई असली, तरीही ती अपवादात्मक उदाहरणंच राहतील. एक जागरूक समाज म्हणून आपण फक्‍त आपल्या आजूबाजूला जे घडतंय, त्याकडे बारकाईनं लक्ष ठेवायला हवं आणि तितक्‍याच बारकाईनं त्याचा विचार करायला हवा!

पिढी, नवी जीवनशैली

आजची पिढी खूप वेगवान जगात वावरते आहे. तिला खूप धावायचं आहे. खूप ताणतणाव सहन करायचे आहेत. कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक अशा निरनिराळ्या पातळींवर झगडायचं आहे. तिथले वेगवेगळे ताणतणाव अंगावर घ्यायचे आहेत. आणि हे करता करता मार्गही शोधायचे आहेत. जे काही करायचं आहे, ते स्वत:चं स्वत:च. त्यातच कोणतंही "रोल मॉडेल' समोर नाही. त्यामुळे घडणाऱ्या गोष्टींचं खापर नव्या पिढीच्या माथी मारण्यातही अर्थ नाही...