Sunday, October 21, 2007

माSSSज!!

माझ्या कोणत्याही वक्तव्यावर अथवा वर्तनावर माझ्या मित्रांची ही ठरलेली प्रतिक्रीया असते. किंबहुना त्यांना आता इतकी सवय झाली आहे की मला शिंकं आली तरी "माSSSज!!" असं ओरडायला ते मागे पुढे पाहत नाहीत. मी काही बोललो तर त्यात माज असतो, मी काही नाही बोललो तरी तो माजच असतो. थोडक्यात अभिषेकीबुवांच्या "काटा रुते कुणाला" या गाण्यातल्या "माझे अबोलणेही विपरीत होत आहे" या वाक्यासारखी माझी अवस्था झाली आहे.

"खाउन माजा पण टाकुन माजू नका" या म्हणीमधल्या पहिल्या प्रकारात मी मोडतो असंही काही आचरट लोकांचं म्हणणं आहे. पण त्याकडे आपण दुर्लक्ष करायला हरकत नाही.

यावरुन मला असं लक्षात येतं की जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांना माज असतो आणि दुसरे ज्यांना माज म्हणजे काय ते कळत नाही. स्वतःला माज असल्याशिवाय माज म्हणजे काय हे पण कळत नाही. म्हणुन मग अशा माणसांमधे "माज" या गोष्टीविषयी अनेक गैरसमज असतात. ते वाट्टेल त्या वर्तनाला माज समजतात, "माज करायला तुमच्यात काहीतरी विशेष असावं लागतं" असलं काहीतरी त्यांना वाटत असतं. तर हे आणि यासारखे इतर काही गैरसमज दुर करण्याचा दस्तुरखुद्दांचा (म्हणजे माझा) विचार आहे.

कधीकधी आपल्या ऐकण्यात येतं, काही जण म्हणत असतात "अरे असं एकदा होऊ दे रे, मग आपण पण असा माज करु ना की सगळे बघत राहतील." मला अशा लोकांची कीव येते. कारण माज ही "करायची" गोष्ट नसुन, माज हा "असावा" लागतो - ही मुलभूत गोष्टच त्यांना माहिती नसते.

आधी माज म्हणजे तरी काय हे इथे सांगितलं पाहिजे. तर मुख्य गोष्ट म्हणजे माज ही कोणत्याही प्रकारची भावना नसुन ती मनाची एक अवस्था आहे. पण तरीही "राग" या भावनेला जशी संताप, चीड, तणतण अशी वेगवेगळी अंगं आहेत तशीच ती माजालाही आहेत. त्यातील काही प्रामुख्याने आढळणारी अंगं आपण पाहु यात. या सगळ्या अंगांतील फरक दर्शवणारी रेघ अगदी बारीक पण ठळक आहे.

१. मी लै भारी
या प्रकारात मोडणार्या व्यक्ती "आपणच या विश्वाचा केंद्रबिंदू आहोत" या पद्धतीने वावरत असतात. असं वागण्यामागे किमान एखाद्या गोष्टीत तरी त्यांना काही विशेष नैपुण्य असतं असं काही नाही. तरीही खगोलशास्त्रापासुन अर्थशास्त्रापर्य़ंत कोणत्याही शास्त्राचं आपल्याइतकं ज्ञान कोणालाही नाही, विणकामापासुन पाककलेपर्यंतच्या सर्व कला आपल्याइतक्या कोणालाही अवगत नाहीत आणि हुतुतु पासुन बिलियर्ड पर्यंत कोणत्याही खेळात आपला हात धरणारा कोणी नाही असा त्यांचा एक समज असतो. पण असं प्रत्येकाला पटवुन देण्याचा त्यांचा काही अट्टाहास नसतो. आपापल्या जगात ते खुश असतात. काही अज्ञानी लोक याला अहंकार समजतात.

२. माझी मर्जी
या प्रकारात मोडणारी माणसं "आपण कोणीतरी आहोत" याऐवजी "आपण कोणी असो अथवा नसो, जसे आहोत तसे पण आपल्या मर्जीने वागणार" या पद्धतीने वावरत असतात. ते आपल्याला वाटेल तसंच वागतात, इतरांना पटो अथवा नाही. त्यामुळे अशा लोकाची निर्णयक्षमता चांगली असते, त्यात अनिश्चितपणा नसतो. याला इतर लोक हट्टीपणा किंवा दुराग्रह समजतात.
३. "तु कोण?" किवा "का म्हणुन?"
माजाबाबत जे अनेक गैरसमज आहेत त्यात - "माज हा नेहमी स्वतःबद्दलच्या काहीतरी समजातुनच असतो" - असाही एक प्रसिद्ध गैरसमज आहे. त्याला या प्रकारात मोडणारी माणसे खोटं ठरवतात.या लोकांची ओळख म्हणजे त्याना "अमुक अमुक कर" असं सांगितलं तर "तु कोण मला सांगणारा?" किंवा "का म्हणुन मी असं करु?" असं उत्तर मिळतं. त्यांचं वर्तन "मी म्हणजे कोण!" किंवा "मला असं वाटतं" याऐवजी "तो मला सांगणारा कोण? मी का असं करायचं" या विचारांनी प्रेरित असतं. अशा वागण्याला अनेकदा तुसडेपणा किंवा खडुसपणा म्हटलं जातं.

तर प्रामुख्याने हे आणि अजुनही बरेच प्रकार असतात. काही लोकांमधे एकापेक्षा जास्त प्रकारच्या माजाच्या छटा पहायला मिळतात. जिथे हे सगळे प्रकार एकत्र येतात तिथे अजुन वरच्या पातळीचा माज तयार होतो. त्याला आपण अत्युच्च माज म्हणुया. या पातळीचा माज असणार्यांची संख्या फार कमी असते. कारण या पातळीचा माज करायला अतिशय खंबीर स्वभाव असावा लागतो. षडरिपूंवरही विजय मिळवावा लागतो.त्याच्याही पुढच्या पातळीवर गेलेल्या माणसांमधे recursive माज असतो. म्हणजे आपल्याला माज आहे याचा पण त्यांनामाज असतो. असं करत करत तो माज वाढतच असतो. त्याला आपण परमोच्च माज म्हणुया. या पातळीवर फार म्हणजे फारच कमी जण पोचतात. आणि याच्याही वरच्या पातळीवर गेलं असता, आपल्याला माज नसुन माजाची निर्मिती आपल्यातुनच होते आहे अशा निर्णयास माणुस पोचतो. आपल्यातुनच माज निर्माण होत असेल तर आपल्यालाच माज कसा असेल? याला आपण सर्वोच्च माज म्हणुया. सर्वोच्च माजाची अवस्था आणि मोक्षाची अवस्था यात फारसा फरक नाही. या पातळीवर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसं असतात.

तात्पर्य म्हणजे मोक्षाची अवस्था गाठायला माजाचा रस्त्या सुद्धा आहे.एक लक्षात ठेवा, तुम्हाला माज असेल तर तो आपोआप होतो, तो कधीही "करावा" लागत नाही.