Tuesday, August 28, 2007

श्रावण...

निसर्गवेड्यांना, कवींना, लेखकांना मोहवणारा श्रावण. त्याची कितीतरी रूपं. ती रूपं शब्दांत पकडण्याचा प्रयत्नही अनेकदा झालेला. सुभाष इनामदार यांनी केलेला हा असाच एक वेगळा प्रयत्न.

Wednesday, August 22, 2007

हॅलो ब्रदर!


बंधुत्व म्हणजे "नात्याने बांधलेले'. आपल्याकडे मैत्रीचा उ"जिवाभावाची मैत्री' असा केला जातो, ज्यात बंधुता आहे. ही भावना गेल्या कित्येक शतकांपासून आपल्याकडे दृढ आहे. अलीकडच्या जागतिकीकरणामुळे बंधुत्वाला वैश्‍विकतेची जोड मिळाली आहे, इतकेच.

विनायक पात्रुडकर

परवाच मराठीत एक नाटक आले, त्याचे नाव आहे "ए भाऊ, डोकं नको खाऊ.' गंमत वाटली. आपण बोली भाषेत असे शब्द नेहमी वापरतो. फक्त सवयीमुळे त्यातल्या गर्भितार्थाकडे दुर्लक्ष होते. "डोकं नको खाऊ' असा त्रागा व्यक्त करतानाही "ए भाऊ' संबोधण्याची आपली पद्धतच बरेच काही सांगून जाते. जाता-येता आपण तसा, "ओ भाऊ', "भावड्या', "दादा', "दादासाहेब', "भाऊसाहेब' असे उल्लेख करीतच असतो. म्हणजे समोरच्या माणसाबद्दल संताप आला तरी अनेकदा "तुम्ही आमच्या भावासारखे, आम्हाला समजावून घ्या' असा उपरोधिक उल्लेख करीत संताप आवरण्याचा प्रयत्न करतो. बंधुत्वाबद्दलची जशी ही एक बाजू आहे, तसा महाभारताचा भावा-भावांमधील तेढ चितारणारा प्रचंड मोठा इतिहासही आपल्याला आहे. भावांमधील अतिप्रेम आणि अतिद्वेष अशा दोन्ही घटना आपल्याला परंपरेतून मिळतात. रामायणातून राम-लक्ष्मणाच्या प्रेमाने ओथंबलेल्या इतिहासाची साक्ष मनात ठेवावी, की एकमेकांचे प्राण घेण्यासाठी सज्ज झालेल्या कौरव-पांडवांचे कुरुक्षेत्र डोळ्यांपुढे आणावे, असा प्रश्‍नही मनात येऊन जातो. दोन्हींचे संदर्भ वेगळे असले, तरी त्यांच्यातल्या नात्यांची मूळ गुंफण भावाभोवती केंद्रीभूत आहे, हेही तितकेच सत्य आहे. अर्थात या नात्यांवर ग्रंथच्या ग्रंथ आपल्याकडे लिहून झाले आहेत. यातील मानवी भावना मूलभूत असल्याने, इतक्‍या वर्षांनंतरही पुराणातले हे ग्रंथ आपण विसरू शकलो नाही. बंधुत्वाच्या नात्याची हीच ताकद याला कारणीभूत आहे.
सुधारणेच्या अलीकडच्या काळात "विश्‍वबंधुता' हा शब्दही रूढ झाला आहे. बांगलादेशाच्या मुक्तीनंतर त्या देशाने भारताचा उल्लेख "मोठा भाऊ' असा केला होता.
अलीकडे जागतिकीकरणानंतर जगाचे खेडे बनले, देशाच्या सीमा आखूड वाटू लागल्या आणि परदेशात जाण्याचे अप्रूपही संपले. राजाश्रयाचा प्रकारही रूढ झाला. चीनने तिबेट काबीज केल्यानंतर दलाई लामा यांनी त्यांच्या शेकडो शिष्यांसह भारतात राजाश्रय स्वीकारला. अगदी अलीकडचे उदाहरण तस्लिमा नसरीन यांचे. मूळची बांगलादेशाची ही बंडखोर लेखिका सध्या कोलकत्यात वास्तव्य करून आहे. त्यांना आपल्या देशात सुरक्षित वाटते, हेच आपले यश. भावा-भावांमधील प्रेमाचे कित्येक चित्रपट निघाले. बंधुत्वाच्या नात्यामध्ये मैत्रीची सुंदर किनार असते. या नात्यात मोकळेपणा असला, तर हे बंध अधिक अतूट होतात, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच समोरच्याविषयी प्रेम असेल, सौहार्दाची भावना असेल, सौख्य असेल, तर त्याचे रूपांतर बंधुत्वात व्हायला वेळ लागत नाही. "शिंडलर्स लिस्ट' या ऑस्करविजेत्या चित्रपटात ज्यूंवरच्या हल्ल्यामुळे अस्वस्थ झालेला ऑस्कर शिंडलर नंतर अकराशे ज्यूंना वाचवितो. 1993 सालच्या या चित्रपटाने जगभर मोठे यश मिळविले होते. दोन महायुद्धांनंतर जगभर बंधुत्वाची भावना अधिक बळकट
होत गेली. आपापल्या देशांमधले वादाचे प्रश्‍न चर्चेने सोडविण्यावर भर वाढला. बंधुत्वाच्या भावनेचा वारंवार उल्लेख होत गेला. आज तर जगभर नाते बांधण्यावर आणि टिकविण्यावर संवाद होताना दिसतो आहे. कुणी संकटात असेल, तर त्याला मदत करताना बंधुत्वाची निखळ भावना ही बळकटी देणारी असते. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीने भावांच्या प्रेमावर शेकडो चित्रपट काढले. "राम-लखन'पासून "हॅलो ब्रदर'सारखे चित्रपट तर लोकांनी डोक्‍यावर घेतले. प्रत्येकाच्याच मनात बंधुत्वाच्या भावनेची उत्कटता असते. संधी मिळाली, की ही भावना उचंबळून येते आणि भावनेच्या नात्याचे नवे बंध निर्माण होतात. जाता-जाता एक वेगळा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे बऱ्याचदा शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र, या भावनेतून नव्या बंधुत्वाचा जन्म होताना दिसतो आहे. आपल्या देशाला हवे असलेले अनेक गुन्हेगार शेजारच्या देशात दडी मारून बसले आहेत.
शत्रुभावना ठेवणाऱ्या देशामुळे आपल्याला त्याच्या बंधुत्वाची किंमतही चुकवावी लागते आहे; जसे हे "भाई' लोक आपल्याला त्रासदायक ठरतात, तशी त्यांची "भाईगिरी'देखील. असा बंधुभाव सोडला, तर जगातील सर्व जण आनंदाने नांदावेत, अशीच भावना मनात राहायला हवी. अर्थात हे रहाटगाडगं असंच सुरू राहणार. घर म्हटलं की भांड्यांचे आवाज येणारच; पण हे भांडं शेजारच्याच्या डोक्‍याला लागू नये, यासाठी काळजी घेणं, हे बंधुत्व. इतकं लक्षात ठेवलं तरी नव्या जमान्यातही असलेल्या मैत्रीच्या आडव्यातिडव्या भावनांना बंधुत्वाचं ऋण समजू शकेल. तेव्हा म्हणत राहा "हॅलो ब्रदर' कारण "बिग ब्रदर' (ईश्‍वर) हे सारं पाहतोच आहे.

Monday, August 13, 2007

गुरु आहेत..

' गुरु ' आहेत..
निसर्गातील भटकंतीतले ते क्षण ,
' शिकवतात ' जे , समरसून बहरण्याचे महत्व..

' गुरु ' आहेत..
पाखरांच्या सहवासातले ते क्षण ,
' शिकवतात ' जे , घरटयातून झेपेचे महत्व..

' गुरु ' आहेत..
प्राण्यांच्या निरीक्षणाचे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , बलाढ्यपणे टिकायचे महत्व..

' गुरु ' आहेत..
दु:ख देणारे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , सुख निद्रेचे महत्व..

' गुरु ' आहेत..
अश्रू पाझरवणारे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , हास्य कारंजींचे महत्व..

' गुरु ' आहेत..
शत्रूशी सामना होणारे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , आत्मविश्वासाच्या ताकदीचे महत्व..

' गुरु ' आहेत..
टीकेचा आघात देणारे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , सुधारणा करण्याचे महत्व..

' गुरु ' आहेत..
स्नेहींच्या विरहाचे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , मनोमिलन जपण्याचे महत्व..

अन,

' गुरु ' आहेत..
सुन्न करणारे मॄत्यूचे ते क्षण ,
' शिकवतात ' जे , जानदार क्षणभंगुरत्वाचे महत्व..

क्षण अन क्षण आहे ' गुरु ' ,
" शिका , घडा अन बना स्वत:ही ' गुरु ' "
गुरुपौर्णिमेदिनी मंत्र हा उच्चारू..

- स्वप्ना कोल्हे