Wednesday, August 20, 2008

मेंदू करा रे प्रसन्न!

मेंदू करा रे प्रसन्न!

- डॉ. आनंद जोशी

मेंदू विज्ञानातील नव्या संशोधनांमुळे माणसाच्या वर्तनावर, त्याला येणाऱ्या अनुभवांवर प्रकाश पडत आहे. अतींद्रिय अनुभव आणि त्यातील गूढता या संशोधनाने भेदली जात आहे.

गूढ अनुभव ही मेंदूचीच करामत असते, मन आणि मेंदू हे एकच असते, नवं शिकण्यासाठी तरुणच असायला हवे असे नाही, मेंदू कोणत्याही वयात नव्या गोष्टी आत्मसात करू शकतो, मानवी मेंदू हा अतिशय लवचिक असतो... अशा अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी मेंदूवरील संशोधनानी सिद्ध होत आहेत. त्यामुळे मेंदू कायम प्रसन्न ठेवायला हवा. मेंदू प्रसन्न करण्यासाठी मग कोणी बौद्धिक कसरतींचा मार्ग अनुसरेल तर कोणी मेडिटेशनचा. मेंदूचे आरोग्य चांगले राहिले तर अल्झायमर, औदासीन्य यांसारखे मेंदूचे विकार दूर ठेवता येतात किंवा त्याची तीव्रता कमी करता येते, बौद्धिक आनंद मिळवता येतो. त्यामुळेच आनंदी राहण्यासाठी मेंदूला अधिकाधिक चालना द्यायला हवी. "मेंदू करा रे प्रसन्न!' असंच हे मेंदूवरचं नवं संशोधन सांगतं.


एकविसावे शतक हे मेंदू विज्ञानाचे शतक आहे. मेंदूविज्ञानातील संशोधनामुळे माणसाच्या वर्तनावर, त्याला येणाऱ्या अनुभवावर प्रकाश पडत आहे. मेंदूत होणाऱ्या क्रिया-प्रक्रिया म्हणजे मन, असे मेंदूविज्ञान मानते. मन आणि मेंदू हे वेगवेगळे नाहीत, असे बर्ट्रांड रसेल हा तत्त्वज्ञ म्हणाला होता. ते आता सं शोधनाने सिद्ध होत आहे. माणसाला येणाऱ्या काही अनुभवांभोवती गूढ वलय असते. या गूढतेमुळे असे अनुभव दैवी किंवा "सुपर नॅचरल' असा सर्वसामान्य समज असतो. यातूनच याला अमुक सिद्धी, त्याला तमुक सिद्धी मिळाली आहे, अशा वावड्या उठतात. मेंदूविज्ञानातील संशोधनामुळे ही गूढता भेदली जात आहे.

विलक्षण अनुभव

त्रेसष्ट वर्षांच्या एका अमेरिकी गृहस्थाला एका कानात सतत घणघणाट ऐकू यायचा. सर्व तऱ्हेचे उपचार क रूनसुद्धा ही घणघण थांबली नाही, तेव्हा या रुग्‌ णाने मेंदूतज्ज्ञांचा सल्ला घेतला. ही घणघण थांबवण्याचा एक मार्ग उरला होता. मेंदूच्या उजव्या अर्धगोलातील सुपीरियर टेम्पोरप गत्यरस या भागात इलेक्‍ट्रोड्‌स ठेवून तो भाग उद्दीपित करावयाचा. अशा उद्दीपनामुळे ही घणघण थांबेल, असा तज्ज्ञांचा कयास होता. रु ग्णाने संमती दिली. मेंदूच्या उजव्या अर्धगोलात विशिष्ट जागी "इलेक्‍ट्रोड्‌स' इम्प्लांट करण्यात आले. विजेचा सूक्ष्म प्रवाह सोडून मेंदूतील तो भाग उद्दीपित करण्यात आला, त्याबरोबर रुग्णाला एक विलक्षण अनुभव आला. रुग्णाला वाटले, आपण शरीराबाहेर आहोत, आपले शरीर ऑ परेशन टेबलावर पडले आहे. उद्दीपन केल्याबरोबर हा अनुभव सतरा सेकंद टिकला. याला "आऊट ऑफ बॉडी' अनुभव म्हणतात. मेंदूतज्ज्ञसुद्धा चकित झाले. रुग्णाच्या संमतीने त्यांनी यावर आणखी संशोधन केले. असा अनुभव येताना मेंदूतील कोणती स्थळे कार्यान्वित होतात, हे मेंदूतज्ज्ञांना शोधून काढायचे होते. उजव्या मेंदूचे उद्दीपन चालू असताना ज्या वेळी रुग्णाला असा अनुभव येईल, त्याच क्षणी त्याच्या मेंदूचे "पीईटी' स्कॅनिंग केले. असे बारा स्कॅन्स केले. "पीईटी' स्कॅनिंगमध्ये रिअल टाइम म्हणजे त्याच क्षणी मेंदूत काय घडामोडी होतात, हे दिसते. रुग्णाला आऊट ऑफ बॉडी अनुभव येत असताना मेंदूतील कोणती स्थळे उजळून निघतात, हे दिसून आले. त्याचा नकाशा तज्ज्ञा ंनी तयार केला. त्याची सुलभ माहिती पुढीलप्रमाणे -

आपल्या शरीराची अवकाशातील स्थिती (स्पेशिअल ओरिएंटेशन) कळण्यासाठी डोळ्याकडून त्वचेतील स्‌ पर्शेंद्रियांकडून, तसेच कानाच्या आतल्या भागात असलेल्या शरीराचा तोल सांभाळणाऱ्या केंद्राकडून जे संदेश येतात त्याचे एकात्मीकरण व्हावे लागते. हे एकात्मीकरण उजव्या अर्धगोलातील टेम्पोरल लोब व परायटल लोब यांच्या जंक्‍शनजवळ होते. आऊट ऑफ बॉडी अनुभव येताना उजव्या मेंदूतील नेमकी हीच जागा उजळून निघालेली स्कॅन मध्ये दिसली. या विविध संवेदनांचे एकात्मीकरण (मल्टिसेन्सरी इंटिग्रेशन) यो ग्य प्रकारे होत नसल्यामुळे रुग्णाला आऊट ऑफ बॉडी अनुभव येत होता, असा या संशोधनाचा निष्कर्ष होता. हा शोधनिबंध १ नोव्हेंबर २००७ च्या न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या जगन्मान्य विज्ञानपत्रि केत प्रकाशित झाला आहे.

तज्ज्ञांचे स्पष्टीकरण - गूढता नाही, विकृती

आऊट ऑफ बॉडी हा अनुभव घेत असताना विविध संवेदनांचे एकात्मीकरण योग्य तऱ्हेने होत नाही, हे सिद्ध करण्यासाठी निरोगी उमेदवारांवर प्रयोग करण्यात आले. या प्रयोगात उजव्या मेंदूतील विशिष्ट भागांना उद्दीपन देऊन सं वेदनांच्या एकात्मीकरणात खंड पाडण्यात आला. खंड पडल्याबरोबर या उ मेदवारांना आऊट ऑफ बॉडी अनुभव आला. गेल्या शतकात पेनफील्ड या मेंदूतज्ज्ञाने मेंदूवर शस्त्रक्रिया करताना विशिष्ट भाग उद्दीपित केल्यानंतर रुग्णाला आपण शरीराबाहेर आहोत, असा अनुभव आल्याचे दाखवून दिले होते. अर्ध शिशी (मायग्रेन), एपिलेप्सी (आकडी - फिट्‌स येणे) या मेंदूच्या विकृतीमध्ये असे विलक्षण अनुभव येतात, याचे कारण हेच असावे, असे मेंदूतज्ज्ञांचे मत आहे. विविध प्रकारच्या स्कॅनिंगमध्ये तसा पुरावाही मिळाला आहे.

काही मनोरुग्णांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा विसर पडतो (डिपर्सनालायझेशन), म्हणजे आपण "स्व'पासून वेगळे आहोत असे वाटते, तर काहींना आजूबाजूचे जग खोटे आहे असे वाटते (डिरिअलायझेशन). असे अनुभव टेम्पोरल लोबच्या विकृतीमुळे होतात, असे मेंदूतज्ज्ञांचे मत आहे.

असे अनुभव अतींद्रिय नसून मेंदूच्या कार्यात खंड पडल्यामुळे किंवा त्रुटी नि र्माण झाल्यामुळे होतात. यात गूढ काही नाही, हा महत्त्वाचा मुद्दा मेंदूतज्ज्ञांनी अधोरेखित केला आहे. ब्रिटिश न्यूरॉलॉजिस्ट मायकेल ट्रि म्बल यांनी "दि सोल इन ब्रेन' या पुस्तकात "एपिलेप्सी'बद्दलचे सखोल विवेचन केले आहे. "ए पिलेप्सी' असलेल्या व्यक्तींमध्ये धार्मिक भावना प्रबळ असतात, असे रुग्‌ णकथा व इतर संशोधनांनी त्यांनी दाखवून दिले आहे. पाश्‍चात्त्य

जगातील धर्माच्या इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला. पाश्‍चात्त्य धर्मातील महान व्यक्तींना एपिलेप्सीचा विकार असावा, असे त्यांना आढळून आले. मॉरमॉ निझमचे संस्थापक जोसेफ स्मिथ यांना बेशुद्धावस्था व वाचा बंद होण्याचे झटके येत असत. हा एपिलेप्सीचा प्रकार असावा, असे त्यांचे मत आहे.

एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध मनोवैज्ञानिक व तत्त्वज्ञ विल्यम जेम्स यांनी "दि व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्‍सपीरियन्सेस' या पुस्तकात अनाहत ध्वनी, डोळ्यांपुढे विलक्षण दृश्‍ये दिसणे, असे अनुभवही "ऑडिटरी व व्हिज्युअल' हॅल्युसिनेशन्स- म्हणजे ऐकण्याचे व दृष्टीचे सं वेदनभ्रम असतात, हे अतींद्रिय अनुभव नव्हेत, असे नमूद केले होते. आज मेंदू विज्ञानातील सं शोधनामुळे ते सिद्ध होत आहे.

रोलॅंड ग्रिफिथ्स यांच्या चमूने निरोगी उमेदवारांना काही विशिष्ट औषधे दिली. या औषधांमुळे मेंदूतील चेताप्रेषकांवर, म्हणजे मेंदूतील काही रसायनांवर प रिणाम होतो. ही औषधे घेतल्यानंतर या निरोगी उमेदवारा ंना बराच काळपर्यंत धार्मिक भावनांचा अनुभव आला. "स्व'चा अर्थ, आध्यात्मिक मर्म, असे या अनुभवाचे स्वरूप होते. ही औषधे मेंदूतील कोणत्या रसायनांवर परिणाम करतात, हे माहीत असल्यामुळे व ही रसायने मेंदूच्या कोणत्या भागामध्ये तयार होतात हेही ठाऊक असल्यामुळे धार्मिक भावनांचे मेंदूतील केंद्र शोधता येईल, असा मेंदूतज्ज्ञांचा कयास आहे.

मेंदू आणि सर्जनशीलता

मेंदूचा उजवा भाग हा भावनिक, तर डावा भाग विश्‍लेषणात तरबेज, उजवा कलात्मक तर डावा भाग तर्क बुद्धीशी निगडित, असे मानले जाते. हे ढोबळ मानाने खरे असले तरी मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांच्या साह्याने काम करतात, हे आता सिद्ध झाले आहे. कलेच्या निर्मितीसाठी भावनात्मक उजव्या मेंदूला डाव्याची म दत होते त्याचप्रमाणे विज्ञानातील शोध नुसत्या तर्कबुद्धीने लागत नाहीत. त्याला ऊर्मीची, म्हणजे उजव्या मेंदूची गरज लागते. मेंदू "होलिस्टिक' पद्धतीने काम करतो; पण उजव्या व डाव्या मेंदूच्या कार्याची सरमि सळ कशी होते, हे सुविकसित होणाऱ्या स्कॅनिंग तंत्रज्ञानामुळे व बोधन चाचण्यांमुळे (कॉ ग्निटिव टेस्टिंग) शक्‍य होणार आहे. निर्मिती करताना कवीला, कलावंताला किंवा वैज्ञानिकाला विलक्षण वैयक्तिक अनुभव येतात, पण या अनुभवात अतीं द्रिय काही नसते. ते अनुभव मेंदूमुळेच निर्माण होतात, असे मेंदूतज्ज्ञांनी दाखवून दिले आहे.

"फ्रॉंटियर्स ऑफ न्यूरॉलॉजी अँड न्यूरोसायन्स' या दर्जेदार ग्रंथात जगातील प्र सिद्ध कलावंत, लेखक- कवी, तत्त्वज्ञ यांना कोणत्या मेंदूच्या विकृती होत्या, याचे तपशीलवार विवेचन केले आहे. दोस्तोव्हस्की या अ भिजात लेखकाला एपिलेप्सीचा विकार होता. फीट येण्याआधी त्याला एक निराळाच अनुभव येई. त्यात त्‌ याला प्रचंड आनंद होत असे. ""कोणत्याही मोबदल्यात मी हा आनंद सोडणार नाही,'' असे तो म्हणत असे. फीट येण्याआधी असा अनुभव येतो त्याला "ऑरा' म्हणतात. हे "ऑरा' विविध प्रकारचे असतात. मेंदूतील विद्युतमं डलात गडबड झाल्यामुळे असा अनुभव येतो. हा अतींद्रिय अनुभव नसून, मेंदूच्या विकृतीचा एक भाग असतो. कला मेंदूत उगम पावते तसेच काही विकृती मेंदूत उगम पावता. या दोहोंचा काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचे मार्ग स्कॅनिंगच्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होत आहेत.

प्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉ हा मनोरुग्ण होता. त्याला कधी उन्माद, तर कधी औदासीन्याचे झटके येत. त्यांनी काढलेली चित्रे व त्याची मेंदूची विकृती यांचा काही तरी संबंध असावा, असा मेंदूतज्ज्ञांचा कयास आहे.

नित्शे या तत्त्वज्ञाला सिफिलीसमुळे मेंदूची विकृती झाली होती. त्याचे प्रखर विचार यातून निर्माण झाले असतील. ""नित्शेला झालेली मेंदूची विकृती त्याने विज्ञानाच्या कामी लावली,'' असे फ्रॉइड नित्शेबद्दल म्हणला होता, त्याच्यात काहीतरी तथ्य असावे, असे मेंदूतज्ज्ञांना वाटते.

डॉ. रामचंद्रन यांनी नादिया या ऑटिस्टिक मुलीचे उदाहरण कला आणि मेंदू या ंच्या संदर्भात दिले आहे. तिचा बुद्‌ध्यांक साठ होता; पण ती सहा वर्षांची असताना उत्तम चित्रे काढत असे. तिने काढलेली घोड्य ाची चित्रे इतकी अप्र तिम होती, की घोडा कॅनव्हासवरून खाली उडी मारेल, असे बघणाऱ्याला वाटावे. डॉ. रामचंद्रन यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. असा `ऑ टिस्टिक सावंट' माणूस खरा जिनियस होत नाही. कारण खरा जिनियस होण्यासाठी इतर कितीतरी गुणविशेष लागतात. तेव्हा खरा जि नियस आणि सावंट यांच्यात समाजाने गल्लत करू नये. हा कळीचा मुद्दा आहे.

दर वेळेला विकृती आणि निर्मिती यांचा सकारात्मक संबंध असतो असे नाही. कार्लस हॉर्न हा प्रसिद्ध जर्मन चित्रकार, पण याला अल्झायमर झाल्यानंतर त्याच्या चित्रकलेला ओहोटी लागली. तो पूर्वीसारखी उत्तम चित्रे अल्झायमर झाल्यानंतर पुन्हा कधीही काढू शकला नाही.

मेंदूची लवचिकता

""आकृती संगमरवरामध्ये तयार होण्याआधीच ती शिल्पकाराच्या डोक्‍यात तयार झालेली असते,'' असे म ायकेल अँजेलो म्हणाला होता. या वाक्‍याचा मेंदू विज्ञानाला अभिप्रेत असलेला अर्थ महत्त्वाचा आहे. मेंदूतील विविध जोडण्यां मुळे कलेची निर्मिती होत असते. प्रत्येकालाच या क्षमता असतात असे नाही, पण ज्याच्यात आहेत त्यांना योग्य वातावरण- म्हणजे नर्चर संगोपन- मिळाले तर या पेशींच्या जोडण्यांचा बाह्या विष्कार होतो. पण पेशींच्या जोडण्या बळकट करण्यासाठी प्रयत्न लागतातच. गायकाला रियाज करावा लागतो, चित्रकाराला चित्रे काढावी लागतात, लेखकाला लिहीत राहावे लागते. प्रयत्न केले नाहीत तर मि ळालेल्या क्षमता गमवाव्या लागतात. "यूज इट ऑर लूज इट' असा हा प्रकार. कारण मेंदू लवचिक असतो.

काही सर्जनशील माणसे विक्षिप्त असतात, असेही आपण पाहतो. हा वि क्षिप्तपणासुद्धा मेंदूतील जोडण्यांमुळे त्यांना मिळालेला असतो. काहीही असले तरी त्याच्यात अतींद्रिय काही नसते, हा मुद्दा महत्त्वाचा.

मेंदू "प्लॅस्टिक' असतो, चिकणमातीला हवा तो आकार देता येतो, पुन्हा बदलता येतो, या गुणधर्माला "प्लास्टिसिटी' म्हणतात. मराठीत लवचिकपणा. मेंदूचा आकार तीच क्रिया पुनःपुन्हा करून बदलता येतो. हे प्रौढ मेंदूतही घडते. याचा अर्थ मेंदूचा ढोबळ आकार बदलत नाही, तर सूक्ष्म स्तरावर मेंदूतील पेशीच्या जोडण्यांची संख्या वाढते. सूक्ष्म स्तरावर मेंदूचा आकार बदलतो. मेंदूच्या कार्यात बदल होतो. त्यायोगे म ाणसाच्या वर्तनात बदल होतो. माणसांच्या वर्तनात बदल होतो. माणसांच्या क्षमतांमध्येही थोडाफार बदल होऊ शकतो.

मेंदूमध्ये शरीराच्या अवयवाचे प्रतिनिधित्व करणारे नकाशे असतात. एखादा बोटाने वाद्य वाजवणारा कलाव ंत असतो, तो रियाज करतो. त्याच्या मेंदूतील अवयवांच्या नकाशात त्याच्या बोटांनी जास्त जागा व्‌ यापलेली असते. फुटबॉ लपटूच्या मेंदूच्या नकाशात पावलाने जास्त जागा व्यापलेली असते. लंडनमधील ट ॅक्‍सी ड्रायव्हरच्या मेंदूचे स्कॅनिंग करून पाहिले तेव्हा रस्त्यांची स्मृती साठवण्याची मेंदूतील जागा ही सामा न्य माणसाच्या मेंदूतील अशा जागेपेक्षा मोठी होती, असे आढळले. यालाच मेंदूची प्लास्टिसिटी म्हणतात. या प्लास्टि सिटीचे आणखीही आविष्कार आहेत. ते कसे ते पुढे पहा -

मेडिटेशन आणि मेंदू

हार्वर्ड विद्यापीठ व मॅसॅचुसेट्‌स जनरल हॉस्पिटलमधील मेंदूतज्ज्ञ सारा लाझार यांच्या संशोधक चमूने मे डिटेशन- ध्यान करण्यावर प्रयोग केले. रोज चाळीस मिनिटे मेडिटेशन, याप्रमाणे सातत्याने नऊ वर्षे मे डिटेशन करणाऱ्या उमेदवारां च्या मेंदूचे प्रयोगाच्या सुरवातीला व अंताला म्हणजे नऊ वर्षांनंतर परत, असे दोन्ही वेळा स्कॅनिंग केले, तेव्हा त्या उमेदवारांच्या मेंदूच्या कॉर्टेक्‍सची जाडी थोडी वाढल्याचे दिसून आले. हे संशोधकांना अपेक्षित होते. कोणतीही क्रिया पुनःपुन्हा केल्यावर त्याचा प्रौढांच्या मेंदूवरही परिणाम होतो. कारण प्रौढांचाही मेंदू लवचिक (प्लॅस्टिक) असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मेडिटेशनचे प रिणाम अतींद्रिय असतात असा समज होता. त्याला धक्का देणारे हे निष्कर्ष होते. भावनांचे संतुलन, एकाग्रता या च्यासाठी मेडिटेशन ध्यान, सेक्‍युलर कॉंटेम्प्लेशन, धर्मनिरपेक्ष चिंतन-मनन याचा उपयोग होतो. मेंदूतील कोणत्या केंद्रावर मेडिटेशनचा परिणाम होऊन भावनांचे संतुलन, एकाग्रता या क्षमता नि र्माण होतात, याबाबतचे संशोधन चालू आहे. हे परिणाम अतींद्रिय नसून, ऐंद्रिय अवयवाशी संबंधित आहेत, हे सिद्ध हो ण्यास मदत होणार आहे.

स्वतःच्या मनाचा धांडोळा घेणे हा मेडिटेशनचा उद्देश असतो. मन म्हणजे मेंदू. मेडिटेशन हा मेंदूचा शोध घेण्याचा एक मार्ग ठरू शकतो. त्यासाठी मेंदू विज्ञानाला मेडिटेशनच्या संशोधनात रस आहे. मेडिटेशनमध्ये स्वेच्छेने एकाच ठिकाणी "अटेन्शन' ठेवायचे असते, हे कठीण असते. विल्यम जेम्स हा मनोवै ज्ञानिक म्‌ हणाला होता, ""ऐच्छिकतेने अटेन्शन, एकाग्रलक्ष्य ठेवणे, ही मानवी मनासाठी (ह्यूमनसायकी) एक विरळा घटना आहे.'' मेडिटेशनची परंपरा हा पा ैर्वात्य तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा पैलू आहे. यात गूढ काही नाही. तेव्हा "अटेन्शन- ट्रेनिंग'साठी प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधक जोनाथन कोहेन मेडिटेशनचा मेंदूविज्ञानाच्या दृष्टीने शोध घेत आहेत.

आज शाळा, कॉलेज, विद्यापीठ या तिन्ही स्तरांवरचे शिक्षण दिले जाते, त्यात विश्‍लेषण कौशल्य (ऍनॅलॅ टिकल स्किल्स) विकसित करण्याकडे भर असतो. फक्त फॅक्‍ट्‌सवर जोर दिलेला असतो. मूलभूत एकाग्र तेचे कौशल्य विकसित (अटेन्शन स्किल्स) करणे, संश्‍लेषणाची (सिंथेटिक) आणि निर्मितीची कौशल्ये विकसित करणे, याकडे दुर्लक्ष केले जाते. धर्मनिरपेक्ष चिंतन-मननाची कौशल्ये शिकवून शिक्षणाच्या एकाच बाजूकडे ढळलेल्या तराजूच्या काट्याचे संतुलन साधता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी मेंदू विज्ञान सिद्ध होत आहे. २००५ मध्ये सोसायटी ऑफ न्यूरो सायंटिस्ट या संस्थेची वार्षिक सभा अमे रिकेत भरली होती. जगभरचे दहा हजार न्यूरो सायंटिस्ट या सभेला उपस्थित होते. दलाई लामाने या सभेत विचार मांडले होते. सेक्‍युलर कॉंटेम्प्लशन- धर्म निरपेक्ष चिंतन, मनन, एकाग्रता व शिक्षण यासंबंधीची जी चर्चा झाली त्यात वरील निष्कर्ष निघाले होते.

प्रसन्न मेंदू

मेंदू लहानपणी लवचिक असतो. त्यात जे काय बदल व्हायचे ते तरुणपण येण्यापूर्वीच होतात, असा एक समज होता. पण मेंदूविज्ञानातील संशोधनाने हा समज खोटा ठरवला आहे. मेंदू लवचिक आहे. प्रौ ढपणीसुद्धा ही लवचिकता टिकून असते. त्याचा उपयोग प्रत्येकाने करून घेतला पाहिजे. तुकारामांच्या ओळींत थोडा बदल करून म्हणता येईल- "मेंदू करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे साधन।' पण ही सिद्धी अतींद्रिय व गूढ नाही, तर ती प्रयत्नांनी कोणालाही मिळवण्यासारखी आहे.

प्रौढपणीसुद्धा मेंदू लवचिक असतो हे माहीत असणे, ही मेंदू प्रसन्न करण्याची प हिली पायरी आहे. तरुण-त रुणी सतत नवतेच्या शोधात असतात, शिकत असतात, त्यामुळे त्यांच्या मेंदूत सतत पेशींच्या नवीन जोड ण्या होत असतात. आज पन्नाशीनंतर निवृत्त झालेल्यांची संख्या वाढली आहे. निवृत्तीनंतर त्यांना जीवन ठप्प झाल्यासारखे वाटते. उदासीनता येते. "आय ऍम ऍन ओल्ड डॉग टु लर्न न्यू ट्रिक्‍स' असे तो माणूस म्हणतो. तेव्हा या ज्येष्ठ नागरिकांसाठी मेंदू विज्ञानातील हे संशोधन आशादायी आहे.

मेंदू प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकाने आपला मार्ग शोधायचा असतो, हे जरी खरे असले तरी काही मार्गदर्शक शलाका देता येतात. रॉबर्ट एपस्टेन हे कॅलिफो र्निया विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर आहेत. त्यांनी क्रिएटि व्हिटीवर संशोधन केले आहे. मेंदू प्रसन्न ठेवण्यासाठी त्याचा ज्येष्ठ नागरिकांना आणि कोणालाही उपयोग करता येईल.

मनामध्ये जी नवीन कल्पना येईल ती पकडून ठेवा. सोडून देऊ नका. ती उपयोगात आणण्यासाठी पावले उचला. हा किस्सा पहा. ऑटोलोवी याला पेशींच्या जैव विज्ञानाबद्दल नोबेल मिळाले. त्याला झोपेत असताना पेशींबद्दल एक नवीन कल्पना सुचली. तो जागा झाला. त्याने ती कल्पना कागदावर खरडली आणि झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर त्याने तो कागद वाचण्याचा प्रयत्न केला. काही उमगेना. कल्पना गहाळ झाली. दुसऱ्या दिवशी त्याला झोपेत त्याच कल्पनेचे स्वप्न पडले. त्याने ताबडतोब कल्पना (कॅप्चर) पकडली. तो उठला. कपडे घातले आणि तडक प्रयोगशाळेत गेला. कल्पनेच्या प्रयोगाची आखणी केली. तर थोडक्‍यात काय, कल्पना उत्तम आहे; पावले उचला.

आव्हानात्मक प्रश्‍न उभे करा. येतील आव्हाने त्यांना सामोरे जा. कठीण प्रश्‍न सोडवताना वर्तनाचे नवीन नम ुने तयार होतात. त्यामुळे मेंदूच्या विविध केंद्रांत देवाणघेवाण वाढते. माहितीच्या ज्ञानाचा पट विस्तारण्याचा प्रयत्न करा. नवीन ज्ञानातील नवीन विचार एकमेकाला जोडले जातात. मेंदूची निर्मिती क्षमता तीक्ष्ण होते. तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत वैविध्य असणे महत्त्वाचे. नवीन ठिकाणी जा, नवीन माणसांना भेटा. यातून नवीन कल्पना निर्माण होतात.

हे सर्व कशासाठी करावयाचे, हा प्रश्‍न साहजिक आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण व्यायाम करतो. व्यायामामुळे एंडॉर फिन्स ही रसायने शरीरात निर्माण होतात. त्यामुळे एक सुखद भावना शरीरभर पसरते. हृदयाची, फुफ्फुसांची ताकदही वाढते. त्याप्रमाणे मेंदू प्रसन्न ठेवण्यासाठी "जॉग युवर ब्रेन' करावे लागते. या बौद्धिक कसरतींचा दुहेरी फायदा होतो. बौद्धिक कसरतीमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहून डिमेन्शिया, अल्‌ झायमर, औदासिन्य यासारखे मेंदूचे विकार दूर ठेवता येतात किंवा त्यांची तीव्रता कमी करता येते, असे सं केत मेंदूवरील संशोधनात मिळत आहेत.

बौद्धिक कसरतीचा दुसरा फायदा म्हणजे मिळणारा बौद्धिक आनंद. हा आनं दसुद्धा मेंदूत जी जैव रसायने बा ैद्धिक कृतीमुळे तयार होत असतात त्यामुळे मिळतो. या जैव रसायनातील एकाचे नाव संस्कृतमधील "आनंद' या शब्दावरून आनंदमाइड असे ठेवले आहे. "आनंदमाइड' ही जागतिक स्तरावर स्वीकारली गेलेली मेंदूविज्ञानातील वैज्ञानिक संकल्पना आहे. मेंदूपेशी-पेशींतील संवाद साधण्याचे काम आनंदमाइड करते, तेव्हा आनंदमाइडने मेंदूचा प्याला भरला तर केशवसुतांच्या पुढील ओळींना निराळा अर्थ प्राप्त होईल.

काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या ।
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या ।

- डॉ. आनंद जोशी