Friday, June 27, 2008

वाट चुकलेली दिशा

कुणाहीव्यक्तीची कोणतीही वर्तणूक बदलायची असेल, तर त्या व्यक्तीस स्वतःला तसं वाटल्याशिवाय आणि तिनं तो निर्णय स्वतः घेतल्याशिवाय ती वर्तणूक कुणीही बदलू शकत नाही. बाहेरील दबाव, धमक्‍या काहीही उपयोगी पडत नाहीत. वेश्‍या व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांबाबत हेच निरंतर सत्य लागू आहे. जोपर्यंत प्रत्येक स्त्री स्वतःहून निर्णय घेत नाही, तोपर्यंत वेश्‍या व्यवसाय संपणार नाही.

डॉ. अरुण गद्रे

1) स्थळ ः यवतमाळ वारांगना वस्ती
तारीख ः 13 जून 2008

2) स्थळ ः सीतामढी (बिहार वारांगना वस्ती
तारीख ः 15 एप्रिल 2008

वस्तीत एका पुरुषाचा खून होतो. त्याच रात्री वारांगना वस्तीभोवती असणारा "सामान्य' माणसांचा समाज या वस्तीतल्या धंदेवाल्या स्त्रियांच्या घरांवर हल्लाबोल करतात. अमानुष मारहाण करतात. एखाद्या लहान मुलाला आगीत फेकले जाते. या स्त्रिया पळून जातात. वस्ती रिकामी होते. त्यांच्या सामानाची लुटमार होते. त्यानंतर हे सामान्य नागरिक (स्त्रियांसह) राजकीय नेते कलेक्‍टरला विनंतीवजा निवेदन देतात, की ही वस्ती इथं नको. थोडक्‍यात, आम्ही जे काम केलंय ते शासनानं पूर्णत्वाला न्यावं.

वास्तविक पाहता अनेक वर्षे या वस्त्या तिथं असतात. वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतात. त्यांचे या सामान्य समाजातूनच तिथे जाणारे गिऱ्हाईक असते. पण आता मात्रा हा आग्रह मूळ धरू लागला आहे, की "वेश्‍यावस्ती' नको आणि वस्त्या अशा उद्‌ध्वस्त केल्या की ती समूळ नाहीसा होईल.भारतीय संसद याच समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांनी बनलेली आहे. ITPA नावांचा (Trafticking) मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. मानवी वाहतूक म्हणजे माणसाची (स्त्री, पुरुष) खरेदी-विक्री व वाहतूक. या कायद्यात संसदेत काही सुधारणा (Amendments) सुचवण्यात आल्या आहेत. आता त्या विचाराधीन आहेत. त्या संसदेनं मान्य केल्या की त्यांचा या कायद्यात समावेश होईल.

या सुधारणांमध्ये एक सुधारणा अशी सुचवण्यात आली आहे, कीजर वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या गिऱ्हाइकाला हे माहीत असेल की ती स्त्री खरेदी-विक्री व वाहतूक करून या व्यवसायात आणली गेली आहे, तर त्या गिऱ्हाइकाला "गुन्हेगार' समजावं व त्याला पोलिसांनी अटक करावी.

ITPA कायद्याप्रमाणे "वेश्‍या व्यवसाय करणे' हा गुन्हा नाही. तरीही अशी सुधारणा का सुचवण्यात आली आहे?यामागे एक गैरसमज आहे तो असा, की वेश्‍या व्यवसाय करणारी प्रत्येक स्त्री ही खरेदी, विक्री व वाहतूक होऊनच या धंद्यात आलेली आहे.प्रत्यक्षात हे असं नाही. वास्तविकता खूप वेगळी आहे. ही सुधारणा सुचवणारी व्यक्ती त्याबद्दल अनभिज्ञ आहे.

ITPA कायद्यानुसार, "अल्पवयीन मुलाला धंदा करायला लावणे' व "खरेदी-विक्री, वाहतूक करून सज्ञान स्त्रीला धंदा करायला लावणे' हे गुन्हे ठरतात. हे अतिशय योग्यच आहे. ते तसेच असायला हवं. त्याबद्दल कुणाचंही दुमत असताच कामा नये. पण वास्तव असंही आहे, की वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया या अल्पवयीन नाहीत, तसेच त्या खरेदी-विक्री व वाहतूक करूनही या व्यवसायात आलेल्या नाहीत. नाइलाजानं का होईना पण स्वच्छेनं त्या या व्यवसायात आलेल्या आहेत. नवरे कमवत नाहीत, नवऱ्यानं टाकलेल्या आहेत, शिक्षण नाही, कोणतेही जगण्यासाठी कौशल्य नाही, काम नाही, स्वतःच्या मुलांना, म्हाताऱ्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना पोसण्याची जबाबदारी यांच्यावर असल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय स्वीकारलेला आहे.

अशी जर परिस्थिती आहे, तर एखाद्या ग्राहकाला हे मुळात समजण्याचा मार्गच काय आहे, की तो ज्या स्त्रीकडे जात आहे ती खरेदी-विक्री-वाहतूक करून आणली गेलेली आहे? अर्थातच जरी ही सुधारणा उदात्त हेतूंनी सुचवण्यात आली असली तरी जर खरोखरच हा कायदा झाला तर प्रत्येक ग्राहक हा "संभाव्य' गुन्हेगार ठरणार आहे. पोलिस प्रत्यक्षात प्रत्येक ग्राहकाला अटक करू शकणार आहेत! एकूणच या वेश्‍या व्यवसायासंबंधित विचार करणाऱ्यांची दिशाच वाट चुकते आहे. मुळात "वेश्‍या व्यवसाय' फक्त "वेश्‍यावस्ती'तच होतो, हा समजच भाबडेपणाचा आहे. तो आता जास्त प्रमाणात "घरात' व "लॉजवर' होतो आहे. आंध्रमध्ये या स्त्रियांमध्ये काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेची आकडेवारी बोलकी आहे. घरात व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया ः 13,591, लॉजमधून व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया ः 11,714 व वेश्‍यावस्तीतून व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया ः फक्त 694! समाजाच्या सर्व स्तरांत हा होतो आहे. काही उच्चभ्रू व मध्यमवर्गीय स्त्रियाही "पैसे' मिळवण्याचा "एक' मार्ग म्हणून या व्यवसायाकडे बघताना दिसत आहेत. या सर्व "न' दिसणाऱ्या मोठ्या भागाचा कुणीही विचार करताना दिसत नाही.

वेश्‍या वस्तीतल्या महिला दरिद्री आहेत, निराधार आहेत, असहाय आहेत म्हणून घृणेचे, हिंसेचे, अत्याचारांचे ते सोपे लक्ष्य बनत आहेत. पण हे सर्व न्याय्य आहे का, उचित आहे का, मुख्य म्हणजे समाजहिताचं आहे का, याचा विचार व्हायला हवा. लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे आपल्या समाजात एकूणच गुप्तरोग, एचआयव्ही व कंडोमचा वापर या सर्वच प्रकारांबद्दल घनघोर अज्ञानाचा काळाकुट्ट काळोख आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या अनेक वर्षांच्या कामानंतर आता कुठे या अंधारात थोडी पहाट दिसू लागली आहे.आता कुठे वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या वस्तीतल्या स्त्रियांना कंडोमचा पुरवठा नियमित व अखंडित होऊ लागला आहे. गिऱ्हाइकाला कंडोम वापराचा आग्रह करू लागल्या आहेत. महिन्याला आरोग्य तपासू लागल्या आहेत. एवढेच नव्हे, तर स्वतःची जबाबदारी उचलू लागल्या आहेत. वस्तीत अल्पवयीन मुलगी आली तर स्वतः पोलिसांना खबर देऊ लागल्या आहेत. बारावी परीक्षेनंतर सेलिब्रेट करायला आलेल्या मुलांचे पैसे नाकारून त्यांना एचआयव्ही, कंडोमचं शिक्षण देऊन घरी परत पाठवू लागल्या आहेत.

नेमकं याच वळणावर, समाज हिंसक होऊन वस्त्या उठवू लागला आहे व असा कायदा येऊ घातला आहे की ज्यामुळे प्रत्येक ग्राहक गुन्हेगार ठरू शकणार आहे. या दोन्ही घटितांबद्दल खूप गंभीर विचार व्हायला हवं. कुणाही व्यक्तीची कोणतीही वर्तणूक बदलायची असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला तसं वाटल्याशिवाय व तिनं तो निर्णय स्वतः घेतल्याशिवाय ती वर्तणूक कुणीही बदलू शकत नाही. बाहेरील दबाव, धमक्‍या, काहीही उपयोगी पडत नाहीत. वेश्‍या व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांबाबत हेच चिरंतन सत्य लागू आहे. जोपर्यंत प्रत्येक स्त्री स्वतःहून निर्णय घेत नाही, तोपर्यंत वेश्‍या व्यवसाय संपणार नाही. वस्तीमागून वस्ती जाळत गेलो. ग्राहकाला गुन्हेगार ठरवलं तरच आज "दृश्‍य' असणाऱ्या वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, ग्राहक व वेश्‍या व्यवसाय उद्या "अदृश्‍य' व भूमिगत होईल. एकदा हा व्यवसाय भूमिगत झाला तर या स्त्रियांना कोण कुठं हुडकणार? त्यांना कंडोम कसे पुरवणार? आज दर महिन्याला गुप्तरोगांचा तपास करवून घेणाऱ्या या स्त्रिया उद्या भूमिगत झाल्यावर कशा तपासल्या जाणार?

या कल्पनेनंही अक्षरशः थरकाप होतो. सर्वत्र संशय, भीती, गुप्तता व असुरक्षितता पसरली व या स्त्रिया आणि ग्राहकांपर्यंत पोचणारी आरोग्यसेवा ठप्प झाली तर? आज आटोक्‍यात येते आहे असं वाटणारी एचआयव्हीची लाट पुन्हा उसळेल हे निश्‍चित. एचआयव्ही फक्त या दुर्दैवी स्त्रियांनाच होत नाही. तिथंच तो थांबत नाही. त्यांच्याकडून तो सामान्य समाजातल्या ग्राहकांना होतो. ग्राहकांकडून त्यांच्या पत्नींना होतो व त्यांच्या पत्नीकडून त्यांच्या निरागस बालकांपर्यंतही पोचू शकतो. आज समाजाच्या प्रत्येक घटकानं थोडं थांबून विचार करायला हवा. वेश्‍या व्यवसायाचं वास्तव समजून घ्यायला हवं. वेश्‍या व्यवसायाचं रूप, त्यात असलेल्या स्त्रिया, गुप्तरोग, एचआयव्ही त्यांच्यापर्यंत पोचणाऱ्या आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवांच्या सुविधा, त्यासंबंधाने समज-गैरसमज, कायदे या सर्वांबाबत आपल्या प्रयत्नांची दिशा वाट तर चुकवत नाही?असा समग्र विचार झाला तरच काही आशा आहे.

3 comments:

Anonymous said...

tuze kadachit barobar aasel pan je kayada karnar aahet tyanchyashi charcha zalyavar te anabidnya aahet kinwa nahit he tharawata yeil.ekandar lekhacha rokh barobar aahe.abhinandan.
prasanna

Anonymous said...

THIS IS A VERY THOUGHTFUL ARTICLE.I AGREE WITH YOUR VIEWS.IN FACT THIS POINT HAD COME UP FOR DISCUSSION IN A MEETING OF ONE ETHICS COMMITTEE OF WHICH I WAS A MEMBER.I SUGGEST THAT THE VIEWS BE SENT TO THE ETH.COMM OF THE ICMR AND OF NARI IN PUNE.
DR D S SHROTRI

Anonymous said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर