Showing posts with label TV. Show all posts
Showing posts with label TV. Show all posts

Saturday, November 3, 2007

मराठी वाहिन्या दिसणाऱ्या आणि असणाऱ्या

महाराष्ट्रातल्या भाषेमध्ये, खाद्य जीवनामध्ये, कपड्यांच्या संस्कृतीमध्ये, प्रेमप्रकरणांमध्ये, विवाह समारंभांमध्ये, व्यक्त होण्याच्या पद्धतींमध्ये इतका वेगळेपणा आहे, की त्यामुळे थक्क व्हायला होतं। मराठी वाहिन्यांवर यातलं फार थोडं दिसतं. कारण कल्पकता आणि अणकुचीदार प्रतिभेचा अभाव आहे. मराठी वाहिन्यांमध्ये या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर ओतल्या, तर मराठी प्रेक्षकाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचाच चेहरामोहरा बदलून जायला वेळ लागणार नाही.

मराठी वाहिन्यांनी एकंदरीतच वेगळं काहीतरी असं हिंदी वाहिन्यांसारखं नसलेलं दाखवलं पाहिजे, असं आपल्याला वाटतं। बहुतेक वेळा आपली ही इच्छा फलद्रुप होताना दिसत नाही. हिंदी वाहिन्यांची सर्वांत मोठी समस्या ही, की त्या अतिशय भडक, मेलोड्रामॅटिक असतात- मग ती वाहिनी मनोरंजनवाहिनी असो की वृत्तवाहिनी असो- भडक आणि मेलोड्रामॅटिक होत जाते. उत्तरेच्या संस्कृतीचा हा मोठाच दोष आहे. महाराष्ट्रात हा दोष फार कमी आहे. नेत्यांच्या नावामागे अलीकडे "जी' लावण्याची टूम आलेली आहे, ती वगळता अर्थात!

महाराष्ट्रातल्या प्रेक्षकाची जगण्याची पद्धत, रसास्वाद घेण्याची पद्धत, कलेची आवड, छंद वगैरे सर्वकाही उर्वरित भारताहून वेगळं आहे। त्याचं प्रतिबिंब खरंतर मराठी वाहिन्यांतील कार्यक्रमात पडणं अभिप्रेत आहे; परंतु, सर्वसाधारणपणे सत्तर टक्के वेळा ते प्रतिबिंब या कार्यक्रमात पडतच नाही. अपवादात्मक मालिका सोडल्यास मराठी मालिकांना मराठी म्हणावं लागतं याचं कारण त्यातल्या पात्रांची आडनावं मराठी असतात! एक साधी परीक्षा या मालिकांच्या बाबतीत करून बघितली असता, त्यातला उथळपणा बाहेर येतो. तो म्हणजे मराठीतल्या बहुतेक मालिका इतर कुठल्याही भाषेत डब करून आडनावं बदलली तर ती मालिका तिथली होते. याचं कारण त्यातला उथळपणा भाषा, प्रांत, संस्कृतीच्या तळाशी जे असतं, ते ढवळून काढणाऱ्या कथा आणि कथानकं न वापरल्यानं निर्माण होत असतो. एक मालिका जेव्हा बनते, तेव्हा ती कितीही भिकार किंवा टाकाऊ असली, तरी काहीतरी स्टेटमेंट करत असते. त्या स्टेटमेंटची जबाबदारी त्या संबंधित वाहिनीची असते. जबाबदारी असते याचा अर्थ कोणत्यातरी कोर्टापुढे त्याची लगेच सुनावणी व्हायला हवी आहे, असा नव्हे; तर महाराष्ट्रासारख्या मराठी भाषक प्रदेशाच्या सांस्कृतिक आकांक्षा कळल्या आहेत वा कळल्या नाहीत, असा त्याचा अर्थ आहे.

वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत वा मनोरंजन वाहिन्यांवरील बातम्यांबाबतही हेच खरं आहे. बऱ्याचदा मराठीतल्या बातम्या या हिंदीतल्या मालिका, "रिऍलिटी शो'ज आणि त्यातील कारागिरांची आयुष्यं यांवरच असतात. ते पाहूनही बऱ्याचदा थक्क व्हायला होतं. महाराष्ट्रात इतकं कमी दाखवण्यासारखं आहे का? की चोवीस तास (खरे तर बाराच) जास्त वाटावेत? मुळात मनोरंजन वाहिनी असो किंवा वृत्तवाहिनी असो, तिचा म्हणून एक मानवी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होणं आवश्‍यक असतं. इंग्रजीतली डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफिक, बी.बी.सी. सारखी वाहिनी असो किंवा अगदी "फ्रेंडस्‌'सारखी असो, एक प्रकारची खोली, गांभीर्य आणि डौल या साऱ्यांमध्ये दिसतो. तो डौल वाहिनीचा मानवी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या अनुषंगानं त्या वाहिनीवर विकसित केलेल्या कार्यक्रमामुळे असतो. हे सर्व होण्याकरता ज्या भाषेतून आणि ज्या प्रदेशातून हे सारं घडतं, त्या ठिकाणच्या सांस्कृतिक वारशाची खोली त्या वाहिनीला पकडता यायलाच हवी. मराठीत हेच नेमकं फार फार अपवादानं दिसतं.
या साऱ्याचा अजून एक आनुषंगिक परिणाम मराठीत दिसतो, तो म्हणजे फॉर्मचा। ही समस्या वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तविषयक कार्यक्रम करणाऱ्या वाहिन्यांमध्ये मोठीच दिसते. वापरण्याजोगे असंख्य आकृतिबंध आहेत. मराठीत ते अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे वापरले गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते बुवा-बाबांच्या भक्तीपर्यंत अनेक अंगांनी संस्कृतीला भिडता येतं. त्यासाठी डॉक्‍युमेंट्रीपासून ते डॉक्‍यूड्रामापर्यंत अनेक आकृतिबंध (फॉर्म) उपलब्ध आहेत. प्रत्येक वेळेला माईकचं बोंडुकलं हातात धरून अपरिपक्व कुणीतरी कुणाच्या तरी मागे धावलंच पाहिजे, असं नाही. याबाबत राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या हिंदी चॅनेलचं बरोबर आणि अनुकरण करावं असंच असतं, असं नाही. मराठी संस्कृतीला चारही अंगांनी भिडण्याचा आत्मविश्‍वास या बाबतीत मराठी वाहिन्यांमध्ये कमी दिसतो, हेच खरं.

यावर अनेक जण असंही म्हणू शकतात, की अमकातमका कार्यक्रम किंवा अमकीतमकी मराठी वाहिनी महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतातच की! यात मुद्दा असा आहे, की त्याहून वेगवेगळं आणि अभिजात देऊन हा मुद्दा सिद्ध झालेलाच नाही। अजून आहे त्याच उष्ट्या- खरकट्यातली ही स्पर्धा आहे. त्यावरचीच ही युक्तिवादांची कुरघोडी. एकीकडे एडवर्ड डी बोनो वगैरे विचारवंतांची नावं मीटिंगमध्ये तोंडावर फेकायची आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोलण्याची वेळ आली, की भांडी फेकून मारण्याची स्पर्धा दाखवायची, असला दारुण मामला आहे हा! यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा- तो म्हणजे, कोणतंही माध्यम म्हणजे त्या माध्यमात वापरलं जाणारं तंत्रज्ञान नव्हे. तंत्रज्ञान हे फक्त मूल्यवृद्धी करतं. एक व्यक्त करण्याचं व्यासपीठ देतं. "सामना' हा मराठी चित्रपट अत्यंत प्राथमिक दर्जाच्या तंत्रानं बनविलेला आहे. त्याच काळाच्या आसपास आलेला "द बर्निंग ट्रेन' हा हिंदी चित्रपट उत्तम तंत्रज्ञानयुक्त होता. "सामना' हा चित्रपट एळिल बनून गेलेला आहे. तीच गोष्ट "पाथेर पांचाली'ची. त्या त्या संस्कृतीत रुजलेल्या मानवी मूल्यांना किती खोलवर भिडता येतं, त्यावर कार्यक्रमांचा आणि वाहिनीचा दर्जा ठरत असतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि पॅकेजिंग हे त्यात मूल्यवृद्धी करते, हे अगदी निःसंशय; परंतु दर्जाचा गाभा मात्र तो नसतो, हेसुद्धा तेवढंच नक्की.

मराठी वाहिन्यांबाबतची अजून एक समस्या म्हणजे मनोरंजनपर मालिका या बहुतांशी घरातच घडणाऱ्या असतात। घरात म्हणजे घरात आणि कार्यालयात किंवा तत्सम ठिकाणी। त्यात घडणारे प्रसंग हे बऱ्याचदा ""हे सर्व येतं कुठून?'' असं वाटायला लावणारे असतात. हिंदीतल्या भंपक मालिकांची बऱ्याचदा इंप्रोव्हाइज केलेली ती तेवढीच भंपक नक्कल असते. फार पूर्वी श्‍याम बेनेगलांची एक मालिका दूरदर्शनवर आली होती. तिचं नाव होतं, "यात्रा.' ती एका ट्रेनच्या देशभरच्या सफरीवरची मालिका होती. महाराष्ट्रात आज माणसं शेती करतात, कारखान्यात जातात, इमारती बांधतात, धरणं बांधतात, हॉस्पिटल्स चालवतात, गाई-म्हशीचं दूध काढतात, साखर कारखान्यांच्या निवडणुका लढवतात, तांड्याने फिरतात, ऊसतोड करायला गाडी-कोयता घेऊन स्थलांतरित होतात. मराठी मालिका बघताना वाटावं, की सर्व महाराष्ट्र मुंबई-पुण्यात चौकोनी बांधकामांमध्ये टेबल-खुर्ची व ड्रेसिंग टेबलभोवती एकवटलेला आहे! महाराष्ट्रातल्या भाषेमध्ये, खाद्य जीवनामध्ये, कपड्यांच्या संस्कृतीमध्ये, प्रेमप्रकरणांमध्ये, विवाह समारंभांमध्ये, व्यक्त होण्याच्या पद्धतींमध्ये इतका वेगळेपणा आहे, की त्यामुळे थक्क व्हायला होतं. एवढंच नव्हे, तर त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत थक्क करणारी आहेच; पण त्याच वेळेला हतबल करणारीसुद्धा आहे. मनोरंजनासाठीच्या आणि वृत्तपटांसाठीच्या कथानकांसाठीही कित्येक पिढ्या पुरेल इतकी सामग्री आहे. मराठी वाहिन्यांवर यातलं फार फार थोडं दिसतं.


लेखक जेव्हा कागद-पेन घेऊन लिहितो, तेव्हा तो कागदासाठी थोडंच लिहितो? तो तर वाचकांसाठी लिहितो। तर मग वाहिन्या आणि त्यावरचे कार्यक्रम टी.आर.पी.साठी (ट्रेड रेटिंग पॉइट्‌स) कसे बनवले जातील? ते माणसांसाठीच बनवायला हवेत. या इथल्या मराठी माणसांसाठीचे कार्यक्रम बनले, तर ते तो पाहीलच, पण असा आत्मविश्‍वास नसणारे "कारकून' आधीच ट्रेड रेटिंग पॉईंट्‌स'ची लोढणी प्रतिभावंतांच्या गळ्यात अडकवत जातात. प्रश्‍न पैशाचा असतो, हे कधी कधी खरंही असतं. पण इथं प्रश्‍न (निव्वळ) पैशाच्या अभावाचा नाहीच. मुख्यत्वेकरून तो कल्पकता आणि अणकुचीदार प्रतिभेच्या अभावाचा आहे. मराठी वाहिन्यांमध्ये या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर ओतल्या, तर मराठी प्रेक्षकाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचाच चेहरामोहरा बदलून जायला वेळ लागणार नाही. शेवटी प्रत्येक क्रांतीची एक वेळ असते. ती आता आलेली आहे!

-- राजू परुळेकर
rajuparulekar@hotmail.com