प्रिय मैत्रीण,
खूपच कालावधीनंतर तुला पुन्हा पत्र पाठवत आहे. कारणंही तशीच आहेत. निमंत्रणाच्या यादीत माझ्या जीवनात आलेल्या त्या "प्रथम स्त्री'नं तुझं नाव सुचवलं आहे.
तुला कल्पना आहेच, आपल्या काळात मागे-पुढे किती गोतावळा असायचा. मित्र-मैत्रिणीतील गुपितं क्षणात गावभर व्हायची. नात्यागोत्याचा केवढा धाक असायचा. आपल्यापैकी किती मित्र-मैत्रिणी किंवा सखे-सोबती पुढे नात्यांचे संबंध जोपासण्यात यशस्वी झाले? आपल्यापैकी कोणा तरी एकाला लवकरात लवकर चतुर्भुज करण्यात पालकांना किंवा नातेवाइकांना धन्यता वाटायची. खरंच का ती एवढी खाष्ट असायची? आपल्यातील आकर्षण, स्नेह आणि प्रेम भावना त्यांना समजत नव्हत्या का? का त्यांचा "इगो हर्ट' होत होता?
त्या काळीही आपण मैत्रीचे संकेत, संवाद, गाठीभेटी, फेरफटके अशी मजा करायचोच. वह्या-पुस्तकांची देवाणघेवाण, पानांवरील खुणा, चित्रं, वेलबुट्टी आणि अधोरेखन (अंडरलाईन) या साऱ्याच्या साह्यानं आपण विचारांचे आदान-प्रदान करायचोच. क्लास, शाळा, कॉलेज कॅन्टीन, कट्टे इथं संपर्क साधायचोच. फार लांब नाही तरी खिडकी, गल्ली, आडरस्ते, कॅनॉल रोड, मंडई, देवदर्शन या मार्गे चुटपुट भेटी होतच असत. काही धाडसी मंडळी या पलीकडे जाऊन क्वचित नाटक वा सिनेमागृहांमध्ये फिरायला जात. खूपच दूर म्हणजे विद्यापीठाच्या मागं किंवा तळ्यापर्यंतही फिरण्याची मजल जात होती. हे सगळं असूनही वहीच्या पानावर, बागेतील झाडावर, कॉलेज इमारतीच्या किंवा टेकडीवरच्या दगडावर किंवा किनाऱ्याच्या वाळूवर हृदयात शिरलेल्या बाणाच्या चित्रात दोघांची नावं शेजारी शेजारी लिहिण्यापलीकडं आपल्यातील नातं जाऊच शकत नव्हतं. त्या काळी तीही एक अद्वितीय घटना होती. या सीमेवर व पलीकडं नात्यागोत्यातल्या मंडळींचा कडक पहारा असे. या सीमेपलीकडं पाहणं किंवा विचार करणं याचीही बंदी असे.
अरे हो, सांगायचं राहूनच जातंय. माझ्या जीवनात "नाते दरवाजानं' शिरलेल्या त्या "प्रथम स्त्री'नं आजपर्यंत बराच गोतावळा जमवला आहे. माझ्या आईनंतर, माझ्या पोटात शिरून तिनं आता माझं मनही काबीज केलं आहे. या सर्वात लेक-लेकी, सुना-जावई या पाठोपाठ नात-नातूही सहभागी आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणींपैकी कोण कोण तुझ्या संपर्कात आहेत? या निमित्तानं त्यांनाही माझ्या आमंत्रणाचा निरोप दे.
खरंच हळूहळू का होईना, पण काळ पालटला.
आजकालच्या मित्रमैत्रिणी कॅन्टीन कट्ट्यावर नाही, तर कॉफी शॉपवर गप्पा मारतात. वह्या-पुस्तकांच्या पानांवरील खाणाखुणा, चित्रं, मजकुरापेक्षा एसएमएस, ई मेल, ब्लॉगवर आपली मनं मोकळी करतात. आपल्या काळातील गाठीभेटींची संकेतस्थळं रस्तारुंदीत गेली आहेत. कॉम्प्युटरवर नवीन संकेतस्थळं निर्माण होत आहेत. फेरफटक्याच्या मोकळ्या जागी श्वास दडपणारी गर्दी असते. मोकळ्या फिरण्याच्या जागी इमारती आणि पुलांचं जंगल वाढलं आहे. पूर्वीच्या भेळ-मिसळीची जागा वडापाव आणि कच्छी दाबेलीने घेतली आहे. आपल्या वेळचे थर्मास आता अडगळीत गेलेत. सध्या एक बरं आहे. बाईकवर जाताना काहीही नेणं-आणणं खूप सोपं जातं.
असो, कालाय तस्मै नम:
पत्र संपतंय, तरी मूळ निरोप लिहायचा राहूनच जातोय. माझ्या जीवनात आलेल्या त्या "प्रथम स्त्री'नं आमच्या लग्नाच्या "डायमंड ज्युबिली'च्या कार्यक्रमात माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना अग्रक्रम दिलाय. तेव्हा येत्या रविवारी नक्की यायचं.
तुझा मित्र
- अविनाश लिमये
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment