गोष्ट गेल्या वर्षीची आहे. तरीही अजून आठवणीत राहिलेली. तेव्हा मी गोव्यात राहात होतो. गोवा-बेळगाव फेरीही अधूनमधून व्हायची. तसा नेहमी मी तिळारी घाटातून जातो, वेळेची बचत हेच कारण असतं त्यामागं. पण त्यावेळी पोहोचायची फारशी घाई नव्हती म्हणून अंबोली घाटातून जायचं ठरलं. ठरलं म्हणजे मी आणि माझा मित्र निघालो होतो बाईकवरून. नेहमी तिळारीमार्गे जात असलो तरी माझा आवडता घाट अंबोलीच, कायम स्वप्नवत वाटणारा! बरेच रस्ते आणि घाट आपण नेहमी जातो म्हणून ओळखीचे असतात. अंबोलीचं तसं नाही. तो घाट आपल्याला दरवेळी वेगळा दिसतो, भासतो आणि जाणवतो. त्या दिवशी तर घाटात फारसं कोणी नव्हतंही. आम्ही अंबोलीला पोहोचेपर्यंत फारतर पाचसात वाहनं गेली असतील.
घाटाच्या मध्यावर आल्यावर आमच्यावर पावसानंही कृपा केली. आधीच हा घाट थंडगार. मी त्याला एसी घाट म्हणतो. त्यात पावसाची हलकी सर पडून गेल्यावर तर विचारायलाच नको! खरोखरच रोमॅंटिक माहोल होता तो. अशावेळी सोबतीला मित्र नको, बायको हवी असं वाटत होतं खरं! पण काय करणार काही गोष्टींना पर्याय नसतो. छानसा घाट, पावसाचा शिडकावा, आजूबाजूची गर्द झाडी आणि माकडं हे सारंसारं अनुभवत आम्ही पुढे जात होतो. काही वाटा संपूच नयेत असं वाटतं त्यातलीच ही एक वाट. यथावकाश बेळगावला पोहोचलो. कामं आटोपली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
खरंतर येतानाही आम्हाला आंबोलीमार्गेच यावंसं वाटत होतं. पण उशीरही झाला होता. म्हणून नाईलाजानं तिलारी घाटातून यायचं ठरवलं. मघाशीच सांगितलं तसं हा घाट मला फारसा आवडत नाही. एकतर तो अवघडही आहे आणि आजपर्यंत केवळ जवळचा रस्ता, अशीच त्याची माझ्या मनातली प्रतिमा आहे. त्या मार्गानं जाणाऱ्यांना बेळगावकडून येतानाचा सुरवातीचा रस्ता नक्कीच डोळ्यासमोर येईल. आधीच मातीचा रस्ता, त्यात पाऊस पडलेला, मग काही विचारायलाच नको! (आधीच मर्कट तशात...) कसंबसं आम्ही तेवढा तो दहा मिनिटांचा पॅच अर्ध्या तासात पार केला. पुढं गेलं की तिथे तिळारी वीज घराची कर्मचारी वसाहत आहे. तिथनं मात्र या रस्त्याचा नूरच बदलला...! हा सारा रस्ता संध्याकाळी सहा वाजता चक्क धुक्याची छानशी दुलई ओढून बसला होता. या धुक्यानं आम्हाला अगदी शेवटपर्यंत साथ केली. घाटाच्या पायथ्याशी दुकानं आहेत. तीसुद्धा धुक्यातच लपली होती. अशावेळी चहा घ्यायलाच हवा, आवश्यकच असतो तो. दाट धुक्यात चहा पिण्याचा आनंद काय होता ते सांगताही येत नाही आणि त्याची कशाशी तुलनाही करता येत नाही!
पुढे तर या घाटानं माझ्यावर मोहिनीच घातली. तो "केवळ जवळचा' रस्ता इतका वेगळाही असू शकतो, हे काही काळ पटतच नव्हतं. माझा मित्र तिथनं नेहमी जाणारा. त्यानं एके ठिकाणी गाडी थांबवली. मला म्हटला हळूहळू पुढे जा, आणि मजा बघ... छानसं गवत पसरलेलं होतं. त्यावर पिवळी पिवळी फुलं फुललेली होती... अर्थात धुक्यानं साथ सोडलेली नव्हती. अगदी काही पावलं पुढं सरकलो असेल तर समोर अथांग दरी पसरलेली! निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण करतो, म्हणजे नक्की काय करतो ते तिथं अनुभवायला मिळालं. ते सौंदर्य अनुभवायला आकाशस्थित ढगही दरीत उतरले होते. हो... मी खाली वाकून ढगही पाहात होतो...
आपल्याला आनंदही चढतो, त्याचीही धुंदी असते याची जाणीव पहिल्यांदा झाली. पुढचा सगळा रस्ता असाच होता. आम्ही ढगातून जसजसा घाट उतरत होतो तसतसे मुके होत गेलो. न जाणो एखादा शब्द बोलायचो आणि ढग दूर जायचे, असंच वाटत राहिलं. काहीवेळा मुकं राहणंच जास्त आनंद देतं, नाही का? अर्थात निसर्गाची ही भव्य नजाकत आणि सौंदर्याचा अनुभव घेताना वेळ कमी पडत होता. मग बोलून वेळ घालवणार कोण? खरंच खूप छान अनुभव होता तो. आपण उगाचच एखाद्याला कानफाट्या म्हणत असतो... मला आज समजतंय, प्रत्येकाची वेळ असते, प्रत्येकाचा मूड असतो... आपण या गोष्टी लक्षातन घेता लेबल चिकटवून मोकळे होतो. हा घाट अनुभवावासा मला कधीच वाटला नव्हता, आता पुन्हा त्याच रस्त्यानं जायला निश्चित आवडेल.
घाट संपला आणि आम्ही पुन्हा नेहमीच्या रस्त्याला लागलो. घाटात असताना काही बोलावंसं वाटत नव्हतं खरं, पण एक ओळ मात्र पुन्हा पुन्हा डोक्यात घोळत होती, "जब रात है ऐसी मतवाली, तो सुबहा का आलम क्या होगा!' आता पुन्हा मी त्याच रस्त्यानं जाणार आहे, पण "सुबहा का आलम' अनुभवायला...!
- अभिजित थिटे
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
kya baat hai...mala mahit nasunhi tya donhi ghatanmadhun chakkar marun alay sarkha vatla...
Post a Comment