Monday, June 25, 2007

युवाशक्तीचा अनोखा आविष्कार- "युवा फॉर सेवा'

वरवर पाहता अतिशय सामान्य आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या प्रसंगांमधून प्रेरित होऊन एखाद्या व्यक्तीने अथवा छोट्याशा समूहाने एखादा उपक्रम हाती घेणं आणि पाहता पाहता त्या लहानशा गोष्टीतून पुढे अनेकांना कल्याणकारक ठरणारा प्रकल्प उभा राहणं हा घटनाक्रम.
२००५ च्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या न्यूऑर्लिन्स परिसराला कॅट्रिना चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि सिऍटलमधल्या University of Washington मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे काही भारतीय विद्यार्थी हळहळले. आपद्‌ग्रस्तांसाठी आपणही काही करायला हवं, ही जाणीव त्यांना स्वस्थ बसू देईना. पण आधीच तुटपुंज्या असलेल्या विद्यावेतनातून काही हिस्सा मदतनिधीसाठी दान करणं त्यांना शक्‍य नव्हतं. आणि अभ्यास/ संशोधन सांभाळून प्रत्यक्ष मदतकार्यासाठी जाणंही सहजसाध्य नव्हतं. तेव्हा या विद्यार्थ्यांनी एक वेगळी वाट शोधली. अमेरिकेत बास्केटबॉल आणि अमेरिकन फुटबॉलचे आंतरविद्यापीठ सामने विद्यापीठांच्या स्टेडियम्समध्येच होतात. अतिशय चुरशीने खेळले जाणारे हे सामने पाहायला प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या प्रेक्षकांना विद्यापीठ परिसरातले पार्किंग लॉट्‌स दाखवणं, पार्किंग परमिट्‌स विकणं इत्यादी कामांसाठी सामन्याआधी ३-४ तास काही स्वयंसेवकांची आवश्‍यकता विद्यापीठाच्या क्रीडा विभागाला भासते आणि या स्वयंसेवकांना थोडाफार मेहनतानाही मिळतो. भारतीय विद्यार्थ्यांच्या त्या गटाने अशा सामन्यांसाठी व्हॉलेंटियर करून मिळालेली रक्कम मदतनिधीला दान करायचं ठरवलं. विद्यापीठ प्रशासनाने त्याला कौतुकाने पाठिंबा दिला आणि कॅट्रिनाग्रस्तांसाठी मदत करण्याची या गटाची इच्छा अशा रीतीने पूर्ण झाली.

यातला एक विद्यार्थी-शोभित माथुरला- या यशामुळे त्याच्या अंगी असलेल्या सामाजिक जाणिवेचे भान आलं. सिऍटल परिसरात सक्रिय असलेल्या आणि भारतीय कार्यकर्त्यांचा भरणा असलेल्या Sewa International या संस्थेशी त्याने संपर्क साधला. आणि प्रामुख्याने भारतात किंवा इतर ठिकाणीही एखाद्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी स्वतःचा वेळ खर्चण्याची... नव्हे वापरण्याची त्याने तयारी दर्शवली. सेवा इंटरनॅशनल ही संस्था जगातल्या १५ हून अधिक देशांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय इ. स्वरूपाचे उपक्रम चालवते. Sewa च्या पदाधिकाऱ्यांची शोभितच्या प्रस्तावाचं स्वागत केलं आणि त्याची शैक्षणिक पार्श्‍वभूमी आणि प्रकल्पांची गरज पाहून भारतातला नाही, पण सुरिनाममधला एक प्रकल्प त्याच्यासाठी निवडला.

दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर टोकाला वसलेला "सुरिनाम' हा सुमारे ५ लाख लोकसंख्येचा छोटासा देश. या देशातले जवळजवळ एक तृतीयांश नागरिक भारतीय वंशाचे आहेत. अठराव्या शतकात ब्रिटिश आणि उच्च वसाहतवाद्यांनी ऊसमळ्यात काम करण्यासाठी आणलेल्या भारतीय मजुरांचे हे वंशज! या लहान देशात शैक्षणिक सुविधांचा तसा अभावच आहे. त्यामुळे काही विषयांचे advanced कोर्सेस चालवण्यासाठी Sewa सारख्या संस्था University of Suriname ला सहकार्य करतात. IT ध्ये भारताने केलेल्या प्रगतीचा डंका सुरिनाममध्ये वाजू लागला. आणि IT शी संबंधित आधुनिक संशोधनाची तोंडओळख आपल्या विद्यार्थ्यांना करून देणारा एक लहानसा तरी कोर्स चालू करण्याची सुरिनाम युनिव्हर्सिटीला निकड वाटू लागली. अमेरिकेतल्या अग्रगण्य विद्यापीठात Computer Science MS झालेला शोभित ही गरज पूर्ण करू शकेल, अशी खात्री Sewa च्या कार्यकर्त्यांना पटली. University of Suriname ध्ये Advanced IT चा short term कोर्स शिकवण्याच्या प्रोजेक्‍टसाठी शोभितची निवड झाली. युवा विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला प्रकल्प म्हणून त्याचं "युवा फॉर सेवा' (YFS) असं बारसंही झालं.

MS पूर्ण झाल्यानंतर नोकरी सुरू होईपर्यंतचा दीड महिना शोभितने सुरिनाममध्ये YFS Fellow म्हणून वेचला. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी I.T. आणि इतर Computer विषयक कोर्सेस शिकवले. पुढील शिक्षणाच्या संधींबद्दल मार्गदर्शन केलं. सुरिनाममधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांबद्दल अधिक जाणून घेतलं आणि मुख्य म्हणजे Sewa International च्या कार्यपद्धतीचंही जवळून निरीक्षण केलं. एका अनोख्या अनुभवाची समृद्ध शिदोरी घेऊन तो अमेरिकेला परतला आणि Amazon com ध्‌ मध्ये रुजूही झाला.

चाचपणीतून यश रुजलं!
पहिला प्रयत्न यशस्वी झाल्याने Sewa कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वासही दुणावला. समाजासाठी काही काळ देण्याची इच्छा असलेले विद्यार्थी इतरही विद्यापीठांमध्ये असतील. आपण त्यांना तशा संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, असं त्यांना प्रकर्षानं वाटू लागलं. शैक्षणिक, वैद्यकीय, ग्रामविकास इत्यादी विषयांशी संबंधित प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या इतरही विद्यार्थ्यांसाठी YFS योजना मोठ्या स्वरूपात राबवता येईल का, याची चाचपणी त्यांनी सुरू केली. शोभितने या वर्षी आयोजनात (overall coordination) सिंहाचा वाटा उचलण्याची तयारी दर्शवली आणि या साऱ्यांच्या परिश्रमाने जून २००७ पासून YFS Fellowship Program साकारत आहे.

शिकत असताना उन्हाळी सुट्टीचा कालखंड किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम अथवा नोकरी सुरू होण्यापूर्वीचा कालखंड एखाद्या सेवाभावी प्रकल्पासाठी देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा Fellowship Program खुला आहे. Sewa International ने आपल्या सहकारी संस्थांच्या मदतीने या वर्षीसाठी अमेरिकेत ४, सुरिनाममध्ये १ आणि भारतात २० प्रकल्पांची यादी निश्‍चित केली आहे. मराठी भाषिकांसाठी विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातले २० ही प्रकल्प महाराष्ट्रातच आहेत! YFS Fellow नी अमेरिकेतल्या Projects साठी किमान ३ आठवडे आणि भारतातल्या Projects साठी किमान ३ महिन्यापर्यंतचा कालावधी देणं अपेक्षित आहे. आलेल्या अर्जदारांची शैक्षणिक पार्श्‍वभूमी, त्यांच्या पसंतीचं क्षेत्र, निर्धारित प्रकल्पाचं स्वरूप याची छाननी करून अर्ज मुलाखतींसाठी निवडले जातात. मुलाखतींदरम्यान भारतातल्या ग्रामीण भागात काम करताना येऊ शकणाऱ्या अडचणींची सविस्तर कल्पना देऊन अंतिम उमेदवारांच्या निवडीचं काम सध्या जोरात सुरू आहे. निवडलेल्या उमेदवारांसाठी आठवडाभराचा मार्गदर्शक वर्गही चालवला जाईल. प्रकल्पांचं निश्‍चित स्वरूप, भारतातले महत्त्वाचे पत्ते, स्थानिक चालीरीतींचा जुजबी परिचय आदी गोष्टींचा त्यात समावेश असेल. या चाळण्यांतून पार झालेले विद्यार्थी आपापल्या Project location ला पाठवले जातील. YFS Fellows ची निर्धारित प्रकल्पाच्या गावी एखाद्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली जाईल. स्थानिक संस्कृतीचा त्यांना जवळून परिचय व्हावा आणि Sewa परिवाराचा एक सदस्य असल्याप्रमाणेच त्यांना राहता यावं, यासाठी हा खटाटोप!

माणसामाणसातला परस्परविश्‍वास कमी होत असण्याच्या सध्याच्या काळात महाराष्ट्रातल्या २० कार्यकर्त्यांनी अमेरिकेतून येणाऱ्या अनोळखी विद्यार्थ्यांना इतक्‍या प्रदीर्घ कालावधीसाठी आपल्या घरी सामावून घेण्याची तयारी दर्शवणं ही बाब निश्‍चितच कौतुकास्पद आहे!

भारतातले काही ठळक प्रकल्प
या २० पैकी काही ठळक प्रकल्पांचा येथे उल्लेख करणं उचित ठरेल. धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा या आदिवासी गावात "बारीपाडा ग्रामविकास समिती' तिथल्या ग्रामस्थांसाठी निरनिराळे उपक्रम चालवते. त्यापैकी "कुपोषण रोखण्यासाठी उपाययोजना,' "जैव ऊर्जा निर्मिती' इ. प्रश्‍नांवर काम करण्यासाठी संस्थेला मुख्यतः पर्यावरण आणि Nutritional Sciences या विषयांच्या विद्यार्थी-स्वयंसेवकांची आवश्‍यकता आहे. नंदूरबारमधील आदिवासींसाठी काम करणाऱ्या "हेडगेवार सेवा समिती'ला सातपुडा पर्वतरांगांमध्ये Eco-tourism ला वाव देता येणं शक्‍य आहे का आणि त्यायोगे आदिवासींना उत्पन्नाचं अजून एक साधन मिळवून देता येईल का, याची चाचपणी करायची आहे. शिवाय जवळपासच्या पाड्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना परस्पर संपर्क राखणं सोयीचं जावं यासाठी HAM Radio Station स्थापन करण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटन आणि tele communications शिकणारे विद्यार्थी इथे येणं अपेक्षित आहे. औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे चालवलं जाणारं इस्पितळ हा मराठवाड्यातल्या गोरगरिबांना मोठाच आधार आहे. परंतु अशिक्षित खेडुतांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी "प्रतिष्ठान'ला स्वयंसेवक हवे आहेत. पुण्यातली "स्वरूपवर्धिनी' ही संस्था विज्ञानशिक्षणाची गोडी खेडोपाड्यातल्या शाळकरी मुलांनाही लागावी यासाठी फिरत्या प्रयोगशाळा चालवते. या फिरत्या प्रयोगशाळा अधिकाधिक सुसज्ज आणि उपयुक्त बनवण्यासाठी काय करता येईल, हे पडताळून पाहण्यासाठी "स्वरूपवर्धिनी'ला मदत हवी आहे. याव्यतिरिक्त येरवड्यातील "सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प' सांगोल्यातील "माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान'सारख्या इतरही काही संस्था आपल्या प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास उत्सुक आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला वेळ समाजकार्यासाठी देणं यात नवीन काहीच नाही. अनिवासी भारतीयांच्या मुलांना भारतातील सामाजिक प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणारी "Indicorps' ही संस?थाही गेली काही वर्ष कार्यरत आहेच. पण कुठल्याही उद्योगसमूहाचं पाठबळ नसताना किंवा पालकांचीही विशेष मदत न घेता केवळ युवकांनी पुढाकार घेऊन युवा विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम विरळाच म्हणायला हवा!

कल्पना आवडली म्हणूनच पटली
YFS आयोजकांना या निमित्ताने काही विशेष अनुभवही आले. YFS चे Application forms अमेरिकेतल्या जास्तीत जास्त विद्यापीठांमध्ये पाठवण्यात आले होते. बहुसंख्य projects भारतात असल्याने, अमेरिकन विद्यापीठांत शिकणारे भारतीय आणि अमेरिकेत वाढलेल्या दुसऱ्या पिढीतले भारतीय वंशाचे विद्यार्थी प्रामुख्याने अर्ज करतील, अशी आयोजकांची अपेक्षा होती. पण भारताशी कुठलाही संबंध नसलेल्या अमेरिकन विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज करून आयोजकांना सुखद धक्का दिला. शिवाय केवळ अमेरिकेतल्याच विद्यापीठांशी संपर्क साधला असताना युक्रेनमधून YFS बद्दल विचारणा करणारे इमेल्स आल्याचं पाहून आयोजक चक्रावले. थोड्या चौकशीअंती काही अर्जदारांनी YFS ची कल्पना आवडून परस्परच इंटरनेटवरून आपल्या chat-friends ना अर्जाच्या soft copies पाठवल्याचं त्यांना कळलं. सेवाभावाचं हे अनोखं Globalization निश्‍चितच स्वागतार्ह आहे... नाही का?

YFS चा हा प्रयोग मोठ्या स्वरूपात प्रथमच येत्या जूनपासून सुरू होत आहे. या वर्षीची अर्ज भरण्याची अंतिम मुदत उलटून गेली असली तरी युवाशक्तीकडून मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून हा प्रयोग पुढच्या वर्षीही आणखी मोठ्या स्वरूपात सादर करण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहील. शिवाय युक्रेनियन अनुभवामुळे माहिती-महाजालाचा जास्तीत जास्त वापर करून अमेरिकेबरोबरच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपमधल्या विद्यार्थ्यांना साद घालण्याचा मानसही पक्का झाला आहे. गतवर्षी ओहोळाप्रमाणे सुरवात झालेल्या YFS चा लवकरच जगभरातल्या युवाशक्तीला जनसेवेच्या प्रेरणेने एकत्र आणणारा विराट महानंद होवो, अशी हार्दिक शुभेच्छा!

- श्रेयस लिमये
ेshreyaslimaye@gmail.com
shreyas@u.washington.edu

(YFS बाबत अधिक माहिती www.Sewausa.org/ yava/ yuva.html या संकेतस्थळावर उपलब्धआहे. खेरीज info@sewausa.org ह्या इमेल address ला आपण अधिक प्रश्‍न विचारू शकता.)
\

No comments: